आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपळगाव सैलानी या ठिकाणी दरवर्षी होळीला जिल्हयाबाहरील अनेक मनोरुग्ण आणून सोडले जातात. त्यातील काही मनोरुग्ण मृतावस्थेत सापडतात, तर काही भटकंती करताना आढळतात. त्यामुळे या ठिकाणी मनोरुग्णालय उभारणीचा प्रस्ताव २०१५ पासून धूळखात पडला आहे. यात्रा आली म्हणजे ती धुळ झटकली जाते, पुढे काहीही होत नाही. यावेळीही आरोग्य उप संचालकांच्या निर्देशानुसार चिखली तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रुग्णालयांना माहिती मागवली होती. यापूर्वी जिल्हा नियोजन सभेत या संदर्भात चर्चा होऊन प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता.
पिंपळगाव सैलानीच्या यात्रेला यंदा ६ मार्च पासून सुरुवात होत आहे. यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी व्यवस्थेचा आढावा घेऊन यंत्रणाही कामाला लागली आहे. परंतु, यावेळी मनोरुग्णालयाबाबत कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. इन्फ्रास्ट्रक्चर बाबतही आरोग्य विभागाने शासनाकडे पत्रव्यवहार केले नाही.
यापूर्वी मनोरुग्णालयाबाबतचा एक अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानुसार ३० खाटांचे रुग्णालय ऊभे करण्यासंदर्भातील माहिती शासनाकडे पाठवण्यात आली होती. मनोरुग्ण कक्ष म्हणून पिंपळगाव सैलानी येत असलेल्या बुलडाणा तालुक्याची व शहराची लोकसंख्येचा सन २०११ च्या जनगणनेनुसार आधारे प्रस्तावित करण्यात आला होता.
पिंपळगाव सैलानी येथे येणाऱ्या मनोरुग्णांची भटकंती थांबवण्यासाठी ही पावले उचलण्यात आली होती. बृहत आराखड्यानुसार महसूल आयुक्तालयाच्या ठिकाणी मनोरुग्णालय असावे याबाबतच्या सूचनाही प्राप्त झाल्या होत्या. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांच्याकडून प्रस्ताव न आल्याने मनोरुग्णांच्या उपचारासाठी बुलडाणा येथे मनोरुग्ण कक्ष स्थापन करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव अजुनही पुढे सरकलेला नाही हे विशेष.
लोकप्रतिनिधींना विसर
भाजप - सेनेची सत्ता असतानाच पालकमंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर तदनंतर आ. एकनाथ खडसे असताना या मनोरुग्णालयाचा प्रस्ताव जिल्हा नियोजनाच्या प्रत्येक सभेत मांडण्यात आला होता. जिल्हा नियोजनने जर ठराविक निधीला मान्यता देण्यासाठी पावलेही उचलली होती. मात्र त्यानंतर हा प्रश्न रेंगाळतच राहिला अन्यथा नियोजनाच्या तरतुदीतून काहीतरी निर्माण झाले असते. पुढेतर आ. डॉ.संजय कुटे व आ. डॉ.राजेंद्र शिंगणे व आता ना. गुलाबराव पाटील यांनी सभेत हा प्रश्न पुढे रेटलेला नाही.
आवश्यक असलेले मनुष्यबळ
मानसोपचार तज्ज्ञ - २, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ -१, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता -४, मनोविकृती परिचारिका - ८, औषध निर्माण अधिकारी २, परिसेविका ( इनचार्ज) - ३, अधिपरिचारीका ६, अभिलेखापाल १, लिपिक १, कक्ष सेवक १२, सफाई कामगार पुरुष ४, सफाई कामगार स्त्री ४, वाहनचालक २, असे ५० कर्मचारी या मनोरुग्ण कक्षासाठी आवश्यक आहे.
संक्षिप्त माहिती...
प्रस्तावित मनोरुग्णालय बुलडाणा तालुक्यात येते, मनोरुग्णालयाच्या मुख्यालयाची लोकसंख्या - ६७४३१, तालुक्याची लोकसंख्या २,४७, ०५४, जिल्ह्याची लोकसंख्या २५,८,०३९, मनोरुग्णांची संख्या - निरंक, जवळचे मनोरुग्णालयाचे नाव - नागपूर. अंतर - ४२५ किमी., मनोरुग्णालयाचा लाभ किती गावांना - जिल्हयातील सर्व गावे व नजीकचे जिल्हे. प्रस्तावित मनोरुग्ण कक्ष भौगोलिक दृष्टया योग्य आहे का - होय. मनोविकृतीची संख्या कशी - १५ पुरुष व १५ महिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.