आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पोटळी शेतशिवारात ८ डिसेंबर रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास रानडुकराच्या कळपाने हैदोस घातला. यावेळी एका रानडुकराने हल्ला करून महिलेसह मुलास जखमी केले. दरम्यान, चाळीस वर्षीय वंदनाबाई खराटे या महिलेच्या धाडसाने त्या बालकाचे प्राण वाचले. यामध्ये तो बालक व महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सुवर्णाताई भागवत हुंबर्डे ही महिला तीच्या तीन वर्षीय यश नामक मुलासह निनाजी हुंबर्डे यांच्या शेतात कापूस वेचत होती. यावेळी चाळीस वर्षीय वंदना नागो खराटे ही महिला सुद्धा त्याच शेतात कापूस वेचत होती. दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास अचानक रानडुकराने मुलावर हल्ला केला. त्यावेळी त्याच्या आईने आरडा-ओरडा केला असता वंदनाताई यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता त्या बालकाला रानडुकराच्या तावडीतून सोडवले.
यावेळी रानडुकराच्या हल्यात त्या सुद्धा गंभीर जखमी झाल्या. महिलांचा आवाज ऐकून बाजूच्याच शेतात काम करत असलेल्या सचिन तायडे या युवकाने त्यांच्याकडे धाव घेत त्यांना रानडुकाराच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रानडुक्कर पसार झाले. मात्र त्याचवेळी त्या रानडुकराने शेतातील बारसू कळसकार यांची वगार, विष्णू भोपळे यांची वासरी, आनंद पाचपुरे यांची वासरी, शिवाजी सपकाळे यांच्या गाईला जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रवी खंडारे यांनी वन विभाग तसेच तहसीलदार यांना माहिती देऊन जखमींना आर्थिक मदत करून बालकाचे प्राण वाचवणाऱ्या त्या रणरागिणीचा सन्मान करावा, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.