आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम हरकरे यांचे प्रतिपादन:आत्मविश्वास व प्रामाणिकपणा असल्यास ध्येय उद्दिष्ट पूर्णत्वास येते; डॉ. हेडगेवार रुग्ण सेवा प्रकल्पांतर्गत पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक चांगला उपक्रम गरजू रुग्णांसाठी सुरु होत आहे. ही पॅथॉलॉजी कोणाशीही स्पर्धा करण्यासाठी स्थापन झाली नाही. तर अल्पदरात गरजू रुग्णांना सेवा देण्याचे सत्कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. आत्मविश्वास व प्रामाणिकपणा असल्यास ध्येय उद्दिष्ट पूर्णत्वास येते, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे यांनी केले.

खामगाव अर्बन बँकेच्या श्री दत्त उपासक मंडळा द्वारा संचालित डॉ. हेडगेवार रुग्ण सेवा प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन ३ एप्रिल रोजी रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभाग संघचालक चित्तरंजनदास राठी, जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, जिल्हा संघचालक बुलडाणा जिल्हा शांतीलाल बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात बँकेचे संचालक तथा डॉ. हेडगेवार पॅथॉलॉजी सेवा प्रकल्प प्रमुख डॉ. अमित देशमुख यांनी अमरावती, अकोला सारखे आपल्या शहरातही डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प सुरू करण्याचा मानस करुन त्याबाबत समिती सोबत सविस्तर चर्चा करून आपल्या शहरातील तथा तालुक्यातील अनेक गरजू व गोरगरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अल्पदरात सामान्य जनतेला आपल्या माध्यमातून सेवा होईल, त्यासाठी अत्याधुनिक मशीनची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर शहरातील डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या कडे सदर प्रस्ताव दिला. त्यावर डॉ. ब्रम्हानंद टाले, डॉ. संजीव भोपळे, डॉ. प्रणाली देशमुख, डॉ. गोपाल सोनी यांनी विनामूल्य सेवा देण्याचे मान्य केले.

त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आशिष चौबिसा यांनी डॉ. हेडगेवार रुग्ण सेवा प्रकल्पांतर्गत पॅथॉलॉजीची स्थापना करून गरजू व गोरगरीब रुग्णांना माफक दरात सेवा उपलब्ध करुन देण्याचा मुळ उद्देश आहे. यापासून कोणत्याही व्यक्तीची व्यक्तीगत प्रसिध्दी मिळवण्याची नाही. तसेच खामगाव अर्बन बँकेच्या सभासदांना सुध्दा तपासणी फी मध्ये विशेष सूट देण्याची घोषणा त्यांनी केली.

कार्यक्रमाला मोहन कुळकर्णी, पुरुषोत्तम काळे, रवींद्र देशपांडे, सुधीर मुळे, सचिन पाटील, जयंत राजुरकर, राजेंद्रसिंह राजपूत, महादेवराव भोजने, नगर संघचालक डॉ. नंदकिशोर भट्टड, तालुका संघचालक संतोष देशमुख, भाजपा सोशल मीडिया सेल प्रमुख सागर फुंडकर, पालिका अध्यक्षा अनिता डवरे यांच्यासह डॉक्टर, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद कस्तुरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...