आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:पायी दिंडीतील महिलांना दुचाकीची धडक

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव येथे पायी जाणाऱ्या दिंडीतील महिलांना दुचाकीने धडक दिल्याची घटना मोताळा ते नांदुरा मार्गावर तिघ्रा फाट्याच्या पुढे १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चार महिला जखमी झाल्या असून त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

तालुक्यातील वाडी, पोफळी येथून शेगाव पायी जाण्यासाठी निघालेली दिंडी ही दुपारी मोताळ्यात आली होती. येथील गजानन महाराज मंदिरात दिंडीला चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चहापाणी झाल्यावर सदर दिंडीचा मुक्काम हा आडविहिर येथे ठरला असल्याने दिंडी ही त्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आडविहिरकडे जात असताना तिघ्रा फाट्याच्या पुढे गेल्यावर मोताळा कडून भरधाव येणारी एम.एच. २१ बी.बी. ४३९३ या क्रमांकाची दुचाकी ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने दिंडीत घुसली आणि दिंडीतील महिलांना धडक दिली. या अपघातात दिंडीतील चार महिला जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये ज्योती म्हस्के, संगीता म्हस्के, विमल जाटोळ, शोभाबाई जाटोळ यांचा समावेश आहे.

सदर दुचाकी चालक हा जायखेडा येथील असून त्याचे नाव दिपक कुऱ्हाडे असल्याची माहिती मिळत आहे तसेच तो मद्यधुंद अवस्थेत असून त्याच्या जवळ काही दारूच्या बाटल्या मिळून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली असल्याने अवैध दारु वाहतुकीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळताच सपोनी विकास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. जखमींना जबर मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचार झाल्यावर जखमींना बुलडाणा येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...