आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमानी:सुलतानपूरच्या तांडा वस्तीमधील काम निकृष्ट; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

सुलतानपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुलतानपूर ग्रामपंचायत अंतर्गत वाॅर्ड क्रमांक २ मध्ये तांडा वस्ती योजनेअंतर्गत लाखो रुपये किमतीच्या सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अंदाजपत्रकानुसार व ज्या वस्तीसाठी मंजूर झाले, त्या ठिकाणी न करता दुसरीकडेच करण्यात येत असून ते देखील निकृष्ट होत आहे. त्यामुळे या बोगस कामाची चौकशी करून नंतरच सदर ठेकेदाराचे बिल अदा करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये धनगर वस्तीत वसंतराव नाईक सुधार योजने अंतर्गत तांडा वस्तीत २५ लाख रुपयांचे सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे. मात्र, हे काम विशिष्ट वस्तीत न करता दुसऱ्याच वस्तीत चालू आहे.

त्यामुळे तांडा वस्तीतील नागरिकांनी पाटील यांच्या घरासमोर सुरू असलेले काम ३ सप्टेंबरला बंद पाडले. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य डॉ. हेमराज लाहोटी यांनी घटनास्थळी धाव घेऊन उपस्थित नागरिकांसोबत चर्चा केली. मात्र संतप्त ग्रामस्थांनी सदर काम हे तांडा वस्तीत करा, अन्यथा आम्ही रस्त्याचे काम होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. हेमराज लाहोटी आणि ग्रामसेवक संतोष शिरसागर यांच्याशी चर्चा करून तांडा वस्तीत काम केले जाईल, अशा सूचना ठेकेदार तुषार हिवरे यांना देऊन काम सुरू केले. या वेळी भानुदास साखरे, ज्ञानेश्वर नारिंगे, ज्ञानू बोर्डे, शिवाजी काळे, दिलीप साखरे, श्याम नारिंगे, प्रताप पाटील, केशव साखरे, संजय ढवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील विकास कामाकडे सरपंच कलावती अवचार यांचे दुर्लक्ष होत आहे. गावात सुरू असलेल्या कामांना भेटी देण्यासाठी देखील त्यांच्याकडे वेळ नसल्याने ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. सरपंच अवचार यांना जर गावातील विकास कामांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर त्यांनी त्या पदाचा त्याग करावा अशी देखील मागणी या निमित्ताने उपस्थित आहे.

बातम्या आणखी आहेत...