आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळा गोंधळ:जिल्हा परिषद, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; शासकीय मालमत्ताच गायब

बुलडाणा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासकीय कार्यालये व ओस पडलेल्या निवासस्थानांची ऐशीतैशी

बुलडाणा शहरात अनेक शासकीय कार्यालये व निवासस्थाने होती. ही निवासस्थाने आता मात्र ओस पडली आहेत. विशेष करुन जि. प. ची निवासस्थाने व कार्यालये ओस पडल्यानंतर त्यांचे दरवाजे, खिडक्या व इतर साहित्यही बेपत्ता झाले आहेत. ते कोठे गेली, कोणी नेले याचा काहीही थांगपत्ता लागत नाही. ही शासकीय मालमत्ता होती. मग त्याचा शोध जिल्हा परिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला नाही, असा प्रश्न चर्चेचा ठरत आहे. विशेष म्हणजे इमारतीला व निवास्थानांना सागवान लाकडाचे दरवाजे व खिडक्या बसवलेल्या होत्या.

बुलडाण्यात इंग्रजांनी शासकीय वसाहत वसवल्यानंतर तेव्हा कौलारू घरे, बंगले व शासकीय कार्यालये निर्माण करण्यात आले होते. इंग्रज गेले व महाराष्ट्राचीही निर्मिती झाली. त्यानंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. जिल्हा परिषदेने त्यांची कार्यालये उभी केली. काही शासकीय निवासस्थानेही उभी राहिली. ती सुद्धा चांगल्या दर्जाची कौलारू होती. एक दशकापूर्वी अनेक कौलारू कार्यालयावर पत्रे चढवली गेली. काही निवासस्थानावरही पत्रे चढवण्यात आली. कौलारू ते टीनपत्राचे कार्यालये व निवासस्थाने आजही शहरात पाहण्यास मिळतात. मात्र काही कार्यालये व निवासस्थानांना सध्या अवकळा आली आहेत. इमारतीची उरलेली लाकडे आता दिसत नाहीत. घराला किंवा कार्यालयाला असलेला दरवाजा व खिडक्या बेपत्ता झालेल्या आहेत. फक्त सिमेंटच्या भिंती तेवढ्या उभ्या आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राची इमारत
जिल्हा उद्योग केंद्राची नवीन इमारत उभी राहिली आहे. या जुन्या जागेचे दरवाजे, खिडक्यांसह इतर साहित्य मात्र दररोज तुटत गेले. दहा ते पंधरा फुटाचा दरवाजाही गायब झाला आहे. उच्च दर्जाच्या खिडक्या, चौकट हे सर्व कोठे गेले हे नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यानंतरही कळले नाही. बांधकाम विभागाने जीर्ण इमारतीचे नवीन वास्तूत रुपांतर करण्यासाठी जेवढी मेहनत घेतली गेली. ती या इमारतीचे साहित्य जपून ठेवण्यासाठी घेतली नाही.

एडेड शाळेमागील कार्यालये व वसाहत
एडेड शाळेच्या मागील बाजूस पशुचिकित्सा कार्यालय होते. आता ते दिसत नाही. तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालय व निवासस्थाने ही होती.आता त्याच्या केवळ भिंती फक्त दिसत आहेत. इमारतीचे साहित्य लोकांनी एक-एक काढून नेले. त्याला कोणी घराच्या उपयोगात आणले तर कोणी विकून टाकले आहे. हे साहित्य असेच जाण्यासाठी शासनाने खर्च केला होता का? असा प्रश्न आहे.

जि. प. बांधकामचे गॅरेज रडारवर
जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा बंगला तर तबेला व बग्गी ठेवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या जि. प. ने देऊनच टाकला आहे. मागच्या बाजूनेच जि. प. च्या बांधकाम विभागाचे गॅरेज होते. हे ठिकाण बंदिस्त होते. आता त्यालाही खिंडार पडत असून त्यामुळे येथेही काही जुने साहित्य असल्यास गायब होण्याची शक्यता आहे. प्रशासकांनी घरीच न बसता याचाही अहवाल घ्यावयास पाहिजे की, अध्यक्षाचे निवासस्थान तबेला का बनला. येथील साहित्य कोणाला व कशाला दिले. दिले नसेल तर गेले कोठे!

बातम्या आणखी आहेत...