आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड पारवा प्रकल्पातून 56 तासांत 81.64 कोटी लिटर पाणी सोडले:ताशी 1 कोटी 45 लाख 80 हजार लिटर विसर्ग

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे पुरापासून संरक्षण करण्याच्या हेतुने विद्रुपा नदीवर दगडपारवा येथे उभारण्यात आलेल्या दगड पारवा प्रकल्पातून 4 ऑगस्ट दुपारी तीन वाजे पर्यंत मागील 56 तासात 81 कोटी 64 लाख 80 हजार लिटर पाण्याचा विसर्ग झाला. प्रकल्पाचा एक दरवाजा अद्यापही उघडा असून यातून विसर्ग सुरु आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक पाहून दरवाजा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रकल्पाचा एक दरवाजा 5 सेंटीमिटरने उघडण्यात आला आहे. यातून 4.05 घनमिटर प्रतिसेकंद (4 हजार 50 लिटर प्रतिसेकंद) विसर्ग सुरु असून तासाला 1 कोटी 45 लाख 80 हजार लिटर विसर्ग होत आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्रुपा तसेच मोर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला सतत येणाऱ्या पुरापासून बचाव करण्यासाठी प्रथम नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही योजना यशस्वी होत नसल्याचे लक्षात आल्या नंतर मोर्णा नदीवर ऊर्ध्व मोर्णा, निम्न मोर्णा तसेच मोर्णा नदीला येवून मिळणाऱ्या दगड पारवा येथे प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाची साठवण क्षमता 21.19 दशलक्ष घनमिटर आहे. यातील 10 दशलक्ष घनमिटर पाणी पुराचे पाणी म्हणून टप्प्या-टप्प्याने नदीपात्रात सोडले जाते. जुलै महिन्यातही प्रकल्प 80 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्या नंतर प्रकल्पाचा एक दरवाजा उघडावा लागला होता.

प्रकल्पात 9.01 दशलक्ष घनमिटर (88 टक्के) जलसाठा उपलब्ध झाल्याने 2 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा ५ सेंटीमिटरने उघडण्यात आला. यातून 4.0.5 घनमिटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. पाण्याची आवक सुरुच राहिल्याने प्रकल्पातून विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. विद्रुपा नदी मोर्णा नदीला येवून मिळते. त्यामुळे प्रशासनाने विद्रुपा तसेच मोर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...