आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास शुल्काचा भरणा न केल्याने घरकुलाचे काम नाही:आवास योजनेतील 117 लाभार्थ्यांचे गुंठेवारीचे नियमानुकुल मंजूर

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेतील मंजुर घरकुलांपैकी गुंठेवारी पद्धतीच्या ११७ लाभार्थ्यांचे नियमानुकुलचे प्रस्ताव मंजुर झाले आहेत. मात्र लाभार्थ्यांनी विकास शुल्काचा भरणा न केल्याने घरकुलाचे काम अद्याप सुरु झालेले नाही.

पंतप्रधान आवास योजनेत मंजुर झालेल्या घरकुलांपैकी २४०० लाभार्थ्याचे प्लॉट गुंठेवारी पद्धतीचे होते. त्यामुळे जो पर्यंत हे प्लॉट नियमानुकुल होत नाहीत. तो पर्यंत त्यांच्या घरकुलाचा नकाशा मंजुर करणे शक्य नव्हते. दरम्यान महापालिकेत २०१४ पासून गुंठेवारीचे नियमानुकुल बंद करण्यात आले होते. परिणामी या लाभार्थ्यांची घरकुले मंजुर होवूनही घरकुलाचे काम सुरु करता आले नाही. अखेर राज्य शासनाने गुंठेवारी नियमानुकुल करण्यास मंजुरी दिल्या नंतर कोरोना काळ सुरु झाला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने गुंठेवारीचे नियमानुकुलचे प्रस्ताव ऑफ लाईन पद्धतीने स्विकारण्यात येत आहे.

केवळ आवास योजनेतील घरकुलच नव्हे तर ज्या नागरिकांकडे गुंठेवारी पद्धतीचा प्लॉट आहे, त्यांनाही गुंठेवारीचे नियमानुकुल करता येत असल्याने ४०२ नागरिकांनी गुंठेवारीचे नियमाकुलचे प्रस्ताव दाखल केले.

हे सर्व प्रस्ताव मंजुर झाले. यात ११७ प्रस्ताव घरकुल लाभार्थ्यांचे आहेत. मात्र, या लाभार्थ्यांनी अद्याप विकास शुल्काचा भरणा न केल्याने घरकुलाचे कामही सुरु झालेले नाही. जो पर्यंत विकास शुल्काचा भरणा केला जाणार नाही, तो पर्यंत घरकुलाचे कामही सुरु करता येणार नाही. तसेच २४०० गुंठेवारीच्या लाभार्थ्यांपैकी अद्याप हजारो लाभार्थ्यांनी गुंठेवारी नियमानुकुलचे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत.

लाभार्थ्याची आर्थिक अडचण

गुंठेवारीचे नियमानुकुल झाल्या नंतर विकास शुल्काचा भरणा हा लाभार्थ्यांला करावा लागणार आहे. साधारणपणे ५ ते ६ हजार विकास शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. या विकास शुल्काचा भरणा केल्या नंतर घरकुलाच्या पायाचा (प्लिंथ) खर्च प्रथम स्वत:ला करावा लागणार आहे. त्यानंतर प्लिंथसाठी केलेला खर्च लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे लाभार्थ्याला हा दोन्ही खर्च करावा लागणार असल्याने गुंठेवारीचे नियमानुकुल मंजुर होवूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे लाभार्थ्यांनी विकास शुल्काचा भरणा केला नसल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...