आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरीची प्रतीक्षा:भूमिगत गटारचा 1309 कोटींच्या दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर मजीप्राकडे

श्रीकांत जोगळेकर | अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत १३०९ कोटी रुपयांचा भूमिगत गटार योजनेचा दुसऱ्या टप्प्यातील सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे महापालिकेने पाठवला आहे. मजिप्राकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्या नंतर हा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल.

अमृतच्या पहिल्या टप्प्यात ७९ कोटींची भूमिगत गटार योजनेची कामे केली. यात ३० आणि ७ एमएलडी क्षमतेचे मलजलशुद्धीकरण केंद्र, मोर्णा नदीच्या दोन्ही बाजूने मलजलवाहिन्या, पीकेव्ही परिसरातील नाल्यावर मलजलवाहिन्या अंथरल्या. तर आता दुसऱ्या टप्प्यात हद्दवाढ भागातही ही योजना राबवली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील संपूर्ण उघडी गटारे बंद करून पाइपच्या माध्यमातून सांडपाणी मलजलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहाेचवले जाईल. या संपूर्ण योजनेचा खर्च १३०९ कोटी रुपये अपेक्षित आहे.

दुसऱ्या टप्प्यात शिलोड येथे पहिल्या टप्प्यातील मलजलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूला ७१ एमएलडी क्षमतेचे मलजलशुद्धीकरण केंद्र उभारणार आहे. त्यामुळे पूर्वीचे ३० आणि नवीन ७१ एमएलडी असे १०१ एमएलडी पाणी पारस औष्णिक वीज केंद्राला देणे शक्य होणार आहे. यासाठी १२.५० एकर जागेची मागणी मनपाने महसूल विभागाकडे केली. तसेच संपूर्ण शहरात १५० मिमी ते १ हजार मिमी व्यासाच्या १ हजार किमी. लांबीच्या मलजलवाहिन्या अंथरल्या जाणार आहेत. प्रत्येक घरातील सेप्टिक टँक या मलजलवाहिनीशी जोडला जाईल. त्यामुळे उघडी गटारे बंद होतील.

मुख्य रस्तेही फोडावे लागतील : मुख्य मलजलवाहिनी एसटीपीपर्यंत नेण्यासाठी मुख्य रस्तेही फोडावे लागणार आहेत. त्यामुळे योजनेचे काम रखडल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

सेप्टेज टॅक्सची केली जाईल आकारणी
संपूर्ण योजना कार्यान्वित झाल्यानंतर मालमत्ता करात अन्य कराप्रमाणेच सेप्टेज टॅक्सची वाढ होणार आहे. हा सेप्टेज टॅक्स मालमत्ता करातील सामान्य कराच्या किती टक्के आकारायचा, याबाबत महासभा निर्णय घेऊ शकते.

तीन ठिकाणी वेटवेल
मलजलशुद्धीकरण केंद्रात एक वेटवेल (विहीर) तर दोन वेटवेल (विहिरी) हद्दवाढ भागात असतील. या वेटवेलमध्ये मलजलवाहिनीतील सांडपाणी संकलित केले जाईल. संकलित केलेले मलजल पंपिंग करून मलजल एसटीपीपर्यंत पोहाेचवले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...