आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी आता केवळ २५ दिवस राहिले आहेत. या २५ दिवसांत महापालिकेला चालू तसेच थकीत अशी १४१ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराच्या वसुलीचे आव्हान उभे ठाकले. कराची वसुली वेगाने व्हावी, यासाठी नियमित कर्मचाऱ्यांसोबत विशेष पथकही तयार केले आहे. दरम्यान ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले. मालमत्ता कर हा मनपाचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्राेत आहे. त्यामुळे प्रत्येक आयुक्त मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित करत असतात.
यावेळीही आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कर वसुली करणाऱ्या नियमित कर वसुली लिपिकासोबतच प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी चार विशेष पथके तयार केली. थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांच्या मालमत्तांना सील लावण्याची कारवाई सुरू आहे. तसेच या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय देखील मनपाने घेतला आहे. मनपाला चालू आर्थिक वर्षात १२२ कोटी २५ लाख थकीत तर ७९ कोटी ५९ लाख चालू आर्थिक वर्षातील असा २०१ कोटी ८४ लाखांचा कर वसुलीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत थकीत करापैकी ३१ कोटी ५ लाख रुपये, तर चालू आर्थिक वर्षातील २९ कोटी १८ लाख रुपये असा एकुण ६० कोटी २४ लाख रुपयांचा कर वसूल करता आलेला आहे.
दोन हप्त्यांमध्ये कर भरा
थकीत करावर दरमहा दोन टक्के म्हणजेच वर्षाला २४ टक्के कर आकारला जातो. त्यामुळे नागरिकांना थकीत कराचा भरणा एकाच वेळी करताना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन थकीत कराचा भरणा दोन हप्त्यात करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.