आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अवैध नळजोडण्यांमुळे वर्षाला 1.50 दलघमी पाण्याची होते चोरी

अकोला / श्रीकांत जोगळेकर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ६०० मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्यांमुळे वर्षाकाठी १.५० दशलक्ष घनमिटर पेक्षा अधिक पाण्याची चोरी होते. एकीकडे शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा तर दुसरीकडे पाण्याची चोरी असा प्रकार सुरु आहे. तुर्तास महापालिकेने २८ दोन इंची अवैध नळजोडण्या बंद करुन त्यावरुन घेतलेल्या ३०० नळजोडण्याचा पाणी पुरवठा खंडित केला.

महान येथून ३२ किमी अंतरावरुन ९०० मिमी आणि ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी जलकुंभांपर्यत पोचवले जाते. मुख्य जलवाहिनी विविध गावांजवळुन गेलेली आहे. तशीच बार्शिटाकळी शहराच्या बायपास मार्गे गेलेली आहे. मुख्य जलवाहिनी असल्याने या वाहितीनुन २४ तास पाणी पुरवठा सुरू असतो. दरम्यान ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर १० ते १२ ठिकाणी लिकेज होते. लिकेज दुरुस्ती करताना बार्शिटाकळी वळण मार्गावर रेल्वे स्थानक रोडने दोन इंची २८ अवैध नळजोडण्या आढळून आल्या.

अशी हाेते पाण्याची चोरी
६०० मिली मिटर व्यासाच्या जलवाहिनीतून ताशी १८ लाख लिटर पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा पूर्णपणे ग्रॅव्हिटीने होतो. त्यामुळे पाण्याला मोठ्या प्रमाणात दाब असतो. तसेच २४ तास पाणी पुरवठा सुरू असतो. त्यामुळेच दोन इंच आकाराची एक नळजोडणी घेऊन त्यातून किमान ३० नळजोडण्या घेतल्या जातात. तूर्तास अशा आठ नळजोडण्या तोडण्यात आल्या. अद्याप दोन इंची आकाराच्या १५ ते २० ठिकाणी अवैध जोडण्या आढळून आल्या असून त्या तोडण्याचे काम येत्या काही दिवसात केले जाणार आहे.

तोट्या नसल्याने पाण्याचा होतो अपव्यय
एका दोन इंची जोडणीतून तासाला ९ हजार ३६० लिटर पाण्याचा पुरवठा होतो. अशा १५ ते २० नळजोडण्या आहेत. २४ तास अवैध नळजोडणीतून पाणी घेतले जात नसले तरी अनेकांनी अवैधरित्या घेतलेल्या नळांना तोट्या लावलेल्या नाहीत. तसेच मुख्य जलवाहिनीवरुन अवैधरित्या दोन इंची जोडणी घेतल्या नंतर या जोडणीतूनही पाण्याचा अपव्यय सुरु असतो. तसेच केवळ याच ठिकाणी नाही तर शहरात तसेच अन्य ठिकाणी पाण्याची चोरी होते. त्यामुळे वर्षाकाठी जवळपास १.२० ते १.५० दलघमी पाण्याची चोरी होते.

एक कोटींहून अधिक नुकसान
काटेपूर्णा प्रकल्पातून वर्षाला २४ दलघमी पाण्याची उचल करताना मनपाला वर्षाकाठी १२ कोटी रुपये खर्च करावे लागतात. मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्यांमुळे १.२० ते १.५० दलघमी पाण्याची चोरी होते. त्यामुळे मनपाला वर्षा काठी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैशाचा फटका बसत आहे.