आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे हाेणार सर्वेक्षण:कुष्ठरुग्ण, क्षयरुग्णांसाठी शोध मोहीम राबवणार 2 लाख 76 हजारांना देणार भेट

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम समन्वय समितीची आढावा बैठक साेमवारी झाली. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील २ लाख ७६ हजार ६५९ घरांना भेटी देणार आहेे. शहरी व ग्रामिण भागातील १३ लाख ८३ हजार २९४ लोकांच्या सर्व्हेद्वारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेणार आहे. निदान न झालेले कुष्ठरुग्णांचा, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविधी औषधोपचाराद्वारे व्दारे संसर्गाची साखळी खंडीत करुन संसर्गाचा आटोक्यात आणण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी बैठकित संबंधिताना दिले.

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम समन्वय समिती आढावा बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, जिल्हा मलेरीया अधिकारी डॉ. आदित्य महानकर, मनपाचे सहायक क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, आरोग्य सेवा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. संदीप बाबर आदि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अशी राहणार यंत्रणा ः कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी १ हजार ४२ चमू तयार केल्या आहेत. चमू १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत घरोघरी भेट देणार आहेत. या सर्वेक्षणाचे काम आशा सेविका व पुरुष स्वंयसेवक करणार आहे. या कालावधीत दररोज एका चमुमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करणार आहे.

कर्मचाऱ्यांना करणार प्रशिक्षित ः जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याकरीता १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शोध मोहिम कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे राबवा. यासाठी जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करा, असा आदेश जिल्हा समन्वय समिती सभेमध्ये अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिला.
आराखड्यानुसार करा नियाेजन : प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेटी दरम्यान कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाबाबतची माहिती देऊन संशयीत रुग्णांची वेळेत तपासण्या करुन उपचार करण्याबाबत प्रोत्साहित करा. उपचाराने हा रोग बरा होतो याची खात्री करुन द्या. रुग्णांची माहिती गोपनीय राहिल यांची दक्षता संबंधितांनी घ्यावी. या शोध मोहिमेतून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण सुटता कामा नये. याकरीता करीता सुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी या वेळी दिले.

असे हाेणार सर्वेक्षण : दररोज एका चमुमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घराच्या दरवाजावर खूण करण्यात येणार आहे. क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास छातीचा एक्स-रे काढण्यात येईल. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप बाबर यांनी दिली. या मोहिमेबाबत पथनाट्य, पोस्टर्स, बॅनर्स व ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...