आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा हद्दवाढ भागातील विकास कामांसाठी 28 कोटींचा निधी:'सीएसआर' दरात वाढ झाल्याने कामे पूर्ण होण्यात येणार अडचणी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दवाढ भागात राज्य शासनाने 28 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. महापालिकेला अद्यापही सात कोटी रुपयाची गरज असून सीएसआर दरात साडेतीन वर्षात 25 टक्के वाढ झाल्याने नियोजित कामे पूर्ण होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

महापालिकेची हद्दवाढ ऑगस्ट 2016 मध्ये झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकी पूर्वीच महापालिकेने हद्दवाढ भागाच्या विविध विकास कामांचा 310 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी तत्कालीन राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. तसेच 20 कोटी रुपयाचा निधीही त्वरित मंजुर केला होता. यात महापालिकेला स्वत:चा 20 टक्के हिस्सा वळता करावा लागला.

महापालिकेने एकाच वेळी 100 कोटी रुपयाच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. विकास कामेही सुरू झाले. यात बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि विद्युत विभागातील कामांचा समावेश आहे. रस्त्याचे डांबरीकरण, कॉक्रीटीकरण, लहान नाल्या, मोठे नाले, दोन पुल, जलवाहिन्या टाकणे, महापालिकेच्या खुल्या जागांना फेन्सिंग करणे, विद्युत पोल उभारणे आदी कामे केली जाणार होती.

दरम्यान राज्य शासनाने 20 कोटी नंतर 12 कोटी रुपयाचा निधी वळता केला तसेच महापालिकेने स्वत:चा 20 कोटी रुपयाचा हिस्सा वळता केला. यानंतर शासनाने 13 कोटीचा निधी दिला. त्यामुळे 65 कोटी रुपयाची विकास कामे पूर्ण झाली. मात्र साडेतीन वर्षापासून राज्य शासनाने राहिलेल्या 35 कोटी रुपयाच्या विकास निधी पैकी एक पैसाही निधी न दिल्याने संबंधित कंत्राटदारांनी कामे बंद केली होती. परंतु आमदार रणधिर सावरकर यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने शासनाने हद्दवाढ भागातील रखडलेल्या विकास कामांसाठी 28 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यामुळे रखडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

निधी मिळाला तरी कामे पूर्ण होणार नाहीत

गेल्या साडेतीन वर्षापासून 35 कोटी रुपयाची विकास कामे रखडली होती. राज्य शासनाने महापालिकेला हद्दवाढ भागासाठी रखडलेल्या 35 पैकी 28 कोटी रुपयाचा निधी दिला. अद्यापही सात कोटी रुपयाचा निधी रखडलेला आहे. तसेच या संपूर्ण कामाचे आदेश साडेतीन वर्षापूर्वीच दिलेले आहेत. या साडेतीन वर्षाच्या कालावधीत बांधकाम साहित्याच्या दरात 25 टक्के वाढ झाली आहे. तर कंत्राटदाराने साडेतीन वर्षापूर्वी असलेले भाव लक्षात घेवून कामे घेतली होती. साडेतीन वर्षापूर्वीच्या बांधकामाच्या मालाच्या किमती आणि आताच्या किमतीत मोठी तफावत असल्याने निश्चित केलेली मात्र रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी अधिक निधीची गरज भासणार आहे.

बातम्या आणखी आहेत...