आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिरकोळ चढउतार वगळता सोयाबीनचे भाव एकाच जागी स्थिरावल्याने बाजारपेठेतील आवक कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणले नाही. गुरुवार, १५ डिसेंबरला दुपारपर्यंत २९३१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. सरासरी भाव ५ हजार ३३५ रुपये क्विंटल मिळाला.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७ ऑक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीचा प्रारंभ झाला. अपवाद वगळता आतापर्यंत सहा हजारांच्या पुढे भाव गेले नाहीत. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सरासरी भाव हे साडेपाच हजार रुपयांच्या जवळपास होते. त्यानंतर किरकोळ चढउतार वगळता भाव स्थिरावले आहेत. गुरुवारी कमीत कमी ४५००, जास्तीत जास्त ५५२० रुपये क्विंटल असे भाव मिळाले.
बुधवारी ३३९१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सरासरी भाव हा ५२०० रुपये प्रतिक्विंटल होता. साडेसहा ते सात हजारांपुढे भाव मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यंदाच्या खरिपात अतिवृष्टीपासून ते परतीच्या पावसापर्यंत पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च लागला. त्यामुळे खर्च आणि मिळणारा भाव हा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन राखून ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.