आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयात कामबंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील 298 परिचारीकांनी यात सहभागी होऊन आज कामबंद आंदोलन केले. त्यामुळे रूग्णसेवेची धुरा नर्सिंगच्या 150 विद्यार्थ्यांवर आली आहे.
वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्व स्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती बाह्य स्त्रोतांव्दारे न करता कायमस्वरुपी करण्यात यावी, यासह विविध १३ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन व कामबंदचा इशारा देण्यात आला होता. 23 ते 28 मे या कालावधीत संघटनेने आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार परिचारिकांनी 23, 24 आणि 25 मे 2022 रोजी एक तास कामबंद आंदोलन व निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता 26 व 27 मे रोजी राज्यव्यापी कामबंदच्या घोषणेनुसार सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिकाही यामध्ये सहभागी झाल्या.
यानंतरही संघटनेच्या मागण्यांची दखल न घेतल्यास २८ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व स्तरावरील रिक्त पदे, कोव्हिड काळात टेंडरभरतीनंतर काढलेले मनुष्यबळ, परिसेविकांची रिक्त पदे, नर्सिंग भत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक भत्ते देण्यात यावे. यासह रजा, बदलीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
298 परिचारिका सहभागी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात तीन दिवसांपासून एक तास कामबंद आंदोलन व निदर्शने करण्यात आली. अद्यापर्यंत शासनासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे 26 मे पासून पूर्णवेळ कामबंद आंदोलन करण्यात येईल. यामध्ये 301 परिचारिका सहभागी आहेत, अशी माहिती राज्य परिचारीका संघटना, अकोलाचे जिल्हा सचिव सतीश कुरटवाड यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.