आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव:बार्शीटाकळीत कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा 30 ते 40 टक्के प्रादुर्भाव

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस असल्याने अनेक भागात पिके साधली आहेत. मात्र आता बोंडअळीच्या संकटाने तोंड वर काढायला सुरुवात केली आहे. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू व बाभुळगावनंतर आता बार्शीटाकळीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिली आहे. गुरुवार, ४ ऑगस्टला विद्यापीठाच्या चमूने केलेल्या पाहणीत कपाशीच्या शिवारात बोंडअळी आढळून आली आहे.

कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे व त्यांच्या चमूने प्रक्षेत्र भेटी देऊन कपाशीच्या शेतांची पाहणी सुरू केली आहे. १ ऑगस्ट रोजी अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू व बाभुळगाव परिसरात प्रक्षेत्र भेटीदरम्यान कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विशेष करून ज्या शेताच्या आसपास कॉटन जिनिंग मिल आहेत व पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात केली आहे. त्या कपाशीवर सध्या फुले, पात्या गुलाबी बोंडअळी ग्रस्त आढळून आल्या आहेत. कॉटन जिनिंग मिलच्या बाजूला असलेल्या शेतात लावलेल्या प्रत्येक कामगंध सापळ्यांमध्ये सरासरी चार ते पाच प्रौढ गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून आले आहेत. कॉटन जिनिंग मिल बाजूलाच असल्यामुळे कपाशीच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सद्यःस्थितीत ५० ते ६० टक्के आढळून आला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

३० ते ४० टक्के प्रादुर्भाव : बार्शीटाकळी येथे प्रक्षेत्र भेट दिली असून, ज्या शेतीच्या आसपास कॉटन जिनिंग मिल आहेत अशा परिसरातील ६० दिवसांच्या पिकात बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा प्रादुर्भाव ३० ते ४० टक्के असल्याचे सांगण्यात आले. या पाहणीच्या वेळी बार्शीटाकळीचे तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर, कृषी सहायक संध्या पाखरे, सहयोगी प्रा. पी. के. राठोड, संशोधन सहयोगी गणेश वाघ आदी उपस्थित होते.

दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी
अकोला तालुक्यात कपाशीच्या शेतामधील जी फुले चिमलेल्या अवस्थेत किंवा डोमकळी सदृश अवस्थेत होती. अशा प्रत्येक फुलात गुलाबी बोंड अळी आढळून आली. असे फुल अलगदपणे निघून येते. ती फुले काढून बघितली असता गुलाबी बोंड अळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलामधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आली. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे. त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...