आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पश्चिम झोनमधील 31 अवैध नळकनेक्शन कट; नळजोडण्या वैध करून घेण्याचे मनपाचे आवाहन

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पश्चिम झोन अंतर्गत लोकमान्य जलकुंभातून पाणी पुरवठा होणाऱ्या न्यू गुरुदेव नगर भागातील आढळून आलेल्या ३१ अवैध नळजोडण्याचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान नागरिकांनी आपल्या अवैध नळजोडण्या वैध करून घ्याव्यात, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शहरात अवैध नळजोडणी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. अवैध नळजोडणी शोधल्या नंतर नळजोडणीचा पाणी पुरवठा खंडित केला जात आहे. ही कारवाई पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन निहाय सुरू आहे. पश्चिम झोनमध्ये लोकमान्य नगर जलकुंभावरून पाणी पुरवठा होणाऱ्या न्यू गुरुदेवनगर भागात चार इंची जलवाहिनीवरील ३१ अवैध नळजोडण्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ज्या जलवाहिनीवरून अवैध नळजोडण्या घेण्यात आल्या, त्या जलवाहिनीचा पाणी पुरवठाच खंडित केला. ही कारवाई महापालिकेचे झोन कंत्राटदार संतोष ढगे यांच्या मार्फत कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, तुषार टिकाईत, विभागीय फिटर पद्माकर गवई, लोकमान्य नगर जलकुंभाचे फिटर सुधीर ढुके, संतोष पाचपोर, नागनाथ मोरे, धनराज पातोंड, गणेश घोडके आदींनी केली. दरम्यान ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडण्या आहेत, त्यांनी नळजोडण्या वैध कराव्यात तसेच ज्या नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत आहे, त्यांनी थकीत पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...