आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मालेगावच्या पाडळदे शिवारात 43 उंट जप्त; 3 उंटांवर उपचार; कत्तलीच्या उद्देशाने शहरात आणल्याचा पोलिसांना संशय

मालेगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कत्तलीच्या इराद्याने आणले जाणारे ४३ उंट तालुका पोलिसांनी संशयावरून जप्त केले. सोमवारी दुपारी पाडळदे शिवारात ही कारवाई करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उंटांची तपासणी करत तीन उंटांवर उपचार केले. शेंदुर्णी येथील गोशाळेत हे उंट ठेवण्यात आले आहे.

धुळ्याहून काही जण उंट घेऊन मालेगावात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती. तालुका पोलिसांनी माहितीची खात्री करत पाडळदे शिवारात उंटांचा ताफा अडवला. यावेळी राजस्थान येथील १६ जण ४३ उंट घेऊन जात असल्याचे आढळून आले. संबंधितांकडे चौकशी केली असता त्यांनी या उंटांचे संगोपन करत असल्याचे सांगितले. कत्तलीच्या हेतूने उंटांची वाहतूक करत नाही. संशय असेल तर बकरी इद झाल्यानंतर हे उंट आम्हाला परत द्या, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी सर्व उंट जप्त करत शेंदुर्णीच्या गोशाळेत ठेवले. पशुधन विकास अधिकारी डाॅ. जावेद खाटीक यांनी उंटांची तपासणी केली.

यातील तिघा उंटांवर उपचार करण्यात आले. काही उंटांना त्वचाविकार जडला असून बरेच उंट अशक्त असल्याचे तपासणीतून समाेर आले. काही उंटांच्या पायांना जखमा झालेल्या आहेत. उंट कुठल्या हेतूने आणले गेले, त्यांचे खरे मालक काेण आहेत याची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू हाेती. चौकशीअंती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.