आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड पारवा प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला:1 कोटी 45 लाख 80 हजार लिटर पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे पुरापासून संरक्षण करण्याच्या हेतूने विद्रुपा नदीवर दगड पारवा येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचा एक दरवाजा 5 सेंटीमीटरने उघडण्यात आला. यातून 4.05 घनमिटर प्रतिसेकंद (चार हजार 50 लिटर प्रतिसेकंद) विसर्ग सुरू असून, तासाला 1 कोटी 45 लाख 80 हजार लिटर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्रुपा तसेच मोर्णा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

दरवाजा 5 सेंटीमीटरने उघडला

शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला सतत येणाऱ्या पुरापासून बचाव करण्यासाठी प्रथम नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही योजना यशस्वी होत नसल्याचे लक्षात आल्या नंतर मोर्णा नदीवर ऊर्ध्व मोर्णा, निम्न मोर्णा तसेच मोर्णा नदीला येवून मिळणाऱ्या दगड पारवा येथे प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाची साठवण क्षमता 21.19 दशलक्ष घनमिटर आहे. यातील 10 दशलक्ष घनमीटर पाणी पुराचे पाणी म्हणून टप्प्या-टप्प्याने नदीपात्रात सोडले जाते.

प्रकल्पात 88 टक्के जलसाठा

जुलै महिन्यातही प्रकल्प 80 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्या नंतर प्रकल्पाचा एक दरवाजा उघडावा लागला होता. तर मागील दोन दिवसापासून दगड पारवा, महान परिसरात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पात 9.01 दशलक्ष घनमिटर (88 टक्के) जलसाठा उपलब्ध झाल्याने 2 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा 5 सेंटीमीटरने उघडण्यात आला. यातून 4.05 घनमिटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा

विद्रुपा नदी मोर्णा नदीला येऊन मिळते. त्यामुळे प्रशासनाने विद्रुपा तसेच मोर्णा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. विशेषत: विद्रुपा नदी खडकी परिसरातून जाते. विद्रुपा नदीकाठी उपनगरे नव्याने वसली आहेत. त्यामुळे या भागाला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पात येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन दरवाजा अधिक प्रमाणात उघडणे आणि बंद करणे याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...