आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका वर्तुळात खळबळ:5 कर्मचाऱ्यांना केले एकाच दिवशी बडतर्फ; विविध प्रकरणात दोष सिद्ध झाल्याने प्रशासनाने केली कारवाई

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील 5 कर्मचाऱ्यांवर विविध प्रकरणात दोष सिद्ध झाल्याने प्रशासनाने एकाच दिवशी शुक्रावारी (19 ऑगस्ट) रोजी बडतर्फ केले. एकाच दिवशी 5 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पाच कर्मचाऱ्यांना बडतर्फ

महापालिकेत दर महिन्याला कर्मचारी सेवा निवृत्त होत आहेत. त्यामुळे वर्ग 3 आणि वर्ग - 4 ची शेकडो पदे रिक्त आहेत. या प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर दुहेरी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज काही प्रमाणात कोलमडले आहे. तर आयुक्त तथा प्रशासक यांना वर्ग - 2 चे अधिकारी उपलब्ध नसल्याने कामकाजाचा गाडा एकट्यालाच हाकावा लागत आहे. अशातच विविध प्रकरणात दोष सिद्ध झाल्याने आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी एकाच दिवशी पाच कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले.

कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची चर्चा

महापालिकेतील पतसंस्थेत अपहार प्रकरणात अडकलेल्या संचालकांपैकी काही संचालकांवर दोष सिद्ध झाले. त्यामुळे प्रशासनाने किशोर सोनटक्के, प्रकाश फुलउंबरकर, सुनिता चरकुले यांना दोष सिद्ध झाल्याने बडतर्फ केले. तर विजय खवले हे काही महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक प्रकरणात अडकले होते. त्यांच्यावरही दोष सिद्ध झाल्याने प्रशासनाने त्यांना बडतर्फ केले. तसेच हवेलीय हे सफाई कामगार कोणतीही पूर्व कल्पना न देता सलग चार ते पाच महिने सुटीवर राहिल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांनाही बडतर्फ करण्यात आले. एकाच वेळी पाच कर्मचारी बडतर्फ झाले असून काही प्रकरणातील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. ही चौकशी पूर्ण झाल्यावर अहवाल प्राप्त झाल्या नंतर आणखी काही कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची चर्चा महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.

कोणताही लाभ मिळणार नाही

बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना आता यापुढे कोणत्याही प्रकारचे वेतन मिळणार नाही. तसेच सेवा निवृत्त झाल्या नंतर निवृत्ती वेतन आदी कोणताही फायदा मिळणार नाही. या कर्मचाऱ्यांना केवळ भविष्य निर्वाह निधीचीच रक्कम मिळेल. दरम्यान प्रशासनाने बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...