आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभाच्या स्ट्रक्चरल ऑडीटसाठी 5.42 लाखांचा खर्च:शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिले पत्र, पैसे दिल्यानंतर कामाला सुरुवात

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धोकादायक ठरलेल्या तीन जलकुंभाच्या स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी 5 लाख 42 हजार रुपये खर्च येईल. या रकमेचा भरणा करावा, या आशयाचे पत्र अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास दिले आहे. पाणी पुरवठा विभागाने या रकमेचा भरणा तसेच मागितलेली माहिती दिल्यानंतर या स्ट्रक्चरल ऑडीटच्या कामास प्रारंभ केला जाईल.

शहरात 1977 साली नविन बसस्थानका मागील दोन आणि जुने शहरातील शिवनगर भागात जलकुंभ बांधण्यात आले होते. 2006 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजना महापालिकेने स्वत:च्या ताब्यात घेतली. हस्तांतरणाच्या वेळी मजिप्राने हे तीन जलकुंभ क्षतीग्रस्त झाल्याची माहिती दिली होती.

प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

मात्र महापालिकेने या जलकुंभाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हे जलकुंभ धोकादायक ठरले आहे. दिव्य मराठीने जलकुंभाची पाहणी करुन 27 ऑगस्ट रोजी ‘शहरातील 3 जलकुंभ धोकादायक स्थितीत 45 वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडीट नाही’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करुन या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

जलकुंभ क्षतीग्रस्त

या वृत्ताची दखल थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतली. त्यांनी थेट महापालिका प्रशासनाला वृत्त पाठवुन याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले होते. या नंतर खडबडुन जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने एक प्रकारे जलकुंभ क्षतीग्रस्त असल्याची कबुली देतानाच या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथून करुन घेण्यात येईल. स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानुसार यावर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती शासनाला पाठवण्यात आली.

स्ट्रक्चरल ऑडीटची तयारी

या अनुषंगाने महापालिका पाणी पुरवठा विभागाने शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय अमरावती यांना पत्र पाठवुन शहरातील तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची विनंती केली होती. या पत्राला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अपलाईल्ड मॅकेनिक्स (उपयोजिता यंत्र शास्त्र विभाग) चे असोसिएट प्रोफेसर बी. एस. लांडे यांनी स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची तयारी दर्शवली आहे.

रकमेचा भरणा करावा लागणार

तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी एकुण 4 लाख 60 हजार रुपये खर्च येणार आहे. या बरोबर 18 टक्के जीएसटीचा भरणाही करावा लागणार आहे. त्यामुळे हा खर्च 5 लाख 42 हजार रुपये झाला. त्याच बरोबर स्ट्रक्चरल ऑडीटसाठी जलकुंभ कोणत्या साली बांधला?, दुरुस्ती किती वेळा केली? तसेच काही बदल केले का? आदी माहितीही अभियांत्रीकी महाविद्यालयाने मागितली आहे. ही माहिती आणि रकमेचा भरणा केल्या नंतर तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाईल. यानंतर आलेल्या अहवालानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...