आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात कृषी पंपाची थकबाकी 576 कोटींवर:66 हजार 658 ग्राहकांकडे थकबाकी, चालू बील भरल्यास कनेक्शन कायम राहणार

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शेतीपंपाच्या एकूण 66 हजार 658 ग्राहकांडे वीजबिलाची थकबाकी 576 कोटी 66 लाखांवर गेली आहे. रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आवश्यक विजेचे नियोजन करता यावे, देखभाल दुरूस्ती करता यावी यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

रब्बी हंगामात वापर वाढला

रब्बी हंगामात विजेचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वीज यंत्रणा अती भारीत होत असल्याने रोहीत्र निकामी होण्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रोहीत्र निकामी झाल्याने महावितरणचे आर्थीक नुकसान होते. ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे अधिकृत वीज जोडणी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भागात कोणी अवैध वीज जोडणी करून वीज वापरत असेल तर ते टाळण्यासाठी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी आहे थकबाकी

जिल्ह्यातील महावितरणच्या विभागनिहाय थकबाकीनुसार अकोला ग्रामीण विभागातील 42 हजार 427 कृषी पंप ग्राहकांकडे 292 कोटी 94 लाख थकले आहेत. याशिवाय अकोट विभागातील 24 हजार 131 कृषी पंपाची थकबाकी 283 कोटी 41 लाखांवर पोहचली आहे.

अकोला शहर विभागात 100 कृषी पंप ग्राहक असून त्यांच्याकडे वीज बिलाचे 30 लाख थकीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिल भरणे अपेक्षीत आहे.

चालू बील भरल्यास कनेक्शन कायम

सध्या महावितरणकडून वीजबिल न भरल्याने कृषी पंपाचे कनेक्शन कापण्यासाठी मोहिम महावितरणकडून राबविण्यात येत आहे. याचा अनेक स्तरावर विरोध करण्यात आला. यामुळे राज्य सरकारकडून सोमवारी शेतकऱ्यांकडील कृषीपंपाचे कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांनी चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्यात येणार आहे.

नियमित बील भरण्याचे आवाहन

महावितरण ही सरकारी कंपनी असली तरी आपल्या ग्राहकांसाठी लागणाऱ्या विजेचे नियोजन करण्यासाठी महावितरणला विविध सरकारी व खाजगी स्त्रोतांकडून वीज विकत घ्यावी लागते. त्यामुळे महावितरणच्या सर्वच वर्गवारीतील वीज ग्राहकांनी वेळेत आणि नियमित वीज बिलांचा भरणा करणे अपेक्षीत आहे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...