आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाळेबंदी:अकाेला, मूर्तिजापूर, अकाेटात उद्यापासून 7 दिवसांसाठी टाळेबंदी, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

अकाेला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच राहणार खुली

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रविवारी जिल्हा प्रशासनाने अकाेला महानगर (अर्थात महापालिका क्षेत्र), अकाेट व मूर्तिजापूर शहर (नगर परिषद क्षेत्र) प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. या क्षेत्रांमध्ये निर्बंध जारी करीत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केला. हे निर्बंध २३ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेपासून ते १ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३पर्यंतच खुली राहणार असून, हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सुविधा मिळणार आहेत. तसेच उद्याेगांना पूर्वीप्रमाणेच परवानगी राहणार आहे.

जिल्ह्यात काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचना व विभागीय आयुक्तांनी रविवारी आदेश जारी केला. त्यानुसार िजल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू केले. ग्राहकांनी शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे, असे आदेशात नमूद करण्यात आहे. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहणार आहे. भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहील. मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहणार आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यावर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही व गुन्हे दाखल हाेणार आहे.

शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थिती
शासकीय कार्यालये आणि बँका(अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी. अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महानगरपालीका, बँकसेवा वगळून) १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येणार आहेत.

खासगी वाहतुकीसाठी परवानगी आवश्यक
मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून, वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधित क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊन परवानगी राहील.

काय राहणार बंद व सुरू
- प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील.
- सर्व प्रकारची बिगर आवश्यक दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत.
- उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहणार आहे.
- लग्न समारंभासाठी पंचवीस व्यक्तींना (वधू व वरासह) मुभा राहणार असून, मात्र यासाठी तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
- सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
- संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलने या कालावधीत बंद राहतील.
- प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील.
- शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत.