आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न जीवनमरणाचा:जिल्ह्यातील 7 लघु प्रकल्प पडले कोरडे तर 5 लघु प्रकल्पांनी गाठला तळ, ग्रामीण भागात पाणी टंचाईचा सामना

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील 36 लघु प्रकल्पांपैकी 7 लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर 5 लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. तसेच 3 प्रकल्पात 1 ते 5 टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषत: जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात तीन मोठे, दोन मध्यम आणि 36 लघु प्रकल्प आहे. मोठे आणि मध्यम प्रकल्प शहरांची, गावांची तहान भागवण्यासोबतच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आणतात तर लघु प्रकल्प संबंधित परिसरात सिंचन, पिण्याचे पाणी तसेच जनावरांची तहान भागवतात. त्यामुळे लघु प्रकल्पातील जलसाठ्यालाही तेव्हढेच महत्व आहे. यावर्षी तापमानात वाढ झाल्याने अनेक प्रकल्पातील जलसाठा कमी झाला आहे.

बार्शिटाकळी तालुक्यातील जनुना, झोडगा, मोऱ्हळ, हातोला, बाळापूर तालुक्यातील कसुरा, तामसी, कवठा हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर अकोट तालुक्यातील भिलखेड, शहापूर लपा, बार्शिटाकळीतील घोटा, पातूर येथील तुळजापूर, विश्वामित्री या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. ज्या गावातील लघु प्रकल्प आटले आहेत तसेच ज्या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्या गाव परिसरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

दोन प्रकल्प अपवाद

जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्प आणि बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा हे दोन प्रकल्प अपवाद ठरले आहेत. या प्रकल्पात अनुक्रमे 37.59, 48.20 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

बातम्या आणखी आहेत...