आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भाच्या विविध भागात गेल्या दोन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतकरी कपाशी लागवडीच्या तयारीत आहेत. ओलीताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. मात्र पेरणी संदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महत्त्वाचा संदेश दिला आहे. अद्याप विदर्भात कुठेही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोसमी पावसाची सुरुवात झाल्यावर सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य 75 - 100 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी अनेक भागात मान्सूनपूर्व पावसालाच मान्सूनचा पाऊस समजून शेतकरी पेरणी करतात. मात्र काही दिवसानंतर पावसाने उसंत घेताच पेरण्या धोक्यात येऊन अंकुरलेली पिके सुकून जातात परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीची पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. सद्यस्थितीत विदर्भात मान्सून दाखल होण्यास अवकाश असल्याने शेताची पुढील पिक नियोजानुसार ताबडतोब मशागत करून घ्यावी. शेत पेरणीसाठी तयार ठेवावे. महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पाणी जागेवरच मुरण्याकरिता शेताची पेरणीपूर्व मशागत समतल रेषेला समांतर किंवा मुख्य उतरला आडवी करावी.
कीड प्रादूर्भाव टाळण्यासाठी...
कपाशीच्या पिकासाठीही महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. शेतात पिकाची फेरपालटची जुनी व पारंपारिक पद्धत आहे. त्यामुळे किडींना यजमान वनस्पती मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते.
72 तासात कमाल तापमानात घट
प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र, नागपूर यांच्या माहितीनुसार 13 व 14 जूनरोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक अंदाजानुसार पुढील 72 तासात कमाल तापमानात घट संभवते. 14 जून दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.