आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गावरील वनोजा इंटरचेंज येथून जवळच २१२ वर छत्रपती संभाजीनगर ते नागपूरकडे जाणाऱ्या वाहनावर ३१ मार्च ला रात्री १० वाजताच्या दरम्यान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बऱ्याच वाहनांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही दुखापतग्रस्त झाले नाही. नुकसानग्रस्त वाहनधारकांनी हेल्पलाइनवर कॉल करून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी आयसी ०९ वनोजा टोल प्लाझा येथे येऊन माहिती दिली. या दगडफेकीत आठ ते दहा वाहन क्षतिग्रस्त झाले असून दगडफेक दोन तास झाल्याची माहिती मिळत आहे.
समृद्धी महामार्गावर होत असलेल्या या दगडफेकीमुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या दगडफेकीत मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एक आयशर गाडीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगरूळपीर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक तुषार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हे दगडफेक करणारे कोण याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत असल्याचे चित्र आहे. समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून आजवर सुमारे ३१ जणांचा अपघात बळी गेला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातदेखील हा मुद्दा गाजला होता. त्यानंतर या महामार्गासाठी नव्याने गाईडलाईन करण्यात येतील, असे सरकारकडून सांगण्यात आपले. मात्र, आता दगडफेकीच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.