आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला एमआयडीसी येथील गोदामामध्ये नामांकित कंपनीच्या ब्रॅंडच्या नावाने बनावट खत तयार करणाऱ्या एका कंपनीवर कृषी निविष्ठा जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करून तब्बल २० लाख ५ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
काय मुद्देमाल सापडला?
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला रोहिणी मोघाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी १५ जून रोजी एमआयडीसी अकोला येथील एका गोदामामध्ये भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यावेळी सोडियम सल्फेट (प्रत्येकी ५० किलो याप्रमाणे) १३५ बॅग, हायब्रीड सुमो ग्रॅन्युएल १७० बकेट, इमल्सिफायर लिक्विड १४ प्लास्टिक टाक्या (२८०० लीटर एकूण), निमसीडस कर्नल ऑईल (२०५० लिटर), रासायनिक खत ०.५२.३४ (एकूण ४०० किलो), किटकनाशक बाटल्या ४० नग इत्यादी व यंत्रसामुग्री इत्यादी साहित्य आढळले. या साहित्याची किंमत २० लाख ५ हजार ७३० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संशयिताला बेड्या
या साहित्याच्या आधारे याठिकाणी शासनाच्या व शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या उद्देशाने जैवउत्तेजक उत्पादने विक्रीचे प्रमाणपत्र असताना नामवंत कंपनीच्या रासायनिक खताच्या बॅगचा वापर करून अवैधरित्या बनावट रासायनिक खत उत्पादन करीत असल्याचे आढळले. याबाबत राहुल नामदेव सरोदे (वय ३६) रा. गांधीनगर पोस्ट ऑफिसजवळ चांदूर अकोला या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा भरारी पथक तसेच तालुकास्तरीय भरारी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पथक प्रमुख डॉ. मुरली इंगळे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक गोपाळ दिगंबर जाधव, जिल्हास्तरीय भरारी पथक सचिव तथा मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला रोहिणी मोघाड, तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुणकर, ग्राम विकास अधिकारी पंकज जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कर्मचारी यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.