आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीत दगड पारवा आणि मोर्णा प्रकल्पातून एकूण 24 कोटी 39 लाख 36 हजार लिटर ताशी विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे मोर्णा नदी दुथडी भरुन वाहात असून पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला येणाऱ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी मोर्णा नदीला येवून मिळणाऱ्या विद्रुपा नदीवर दगड पारवा येथे प्रकल्प बांधण्यात आला. या प्रकल्पामुळे 9 दलघमी पाणी शहरातुन वाहणाऱ्या मोर्णा नदीत येवू शकले नसले तरी दगड पारवा प्रकल्पातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान मोर्णा नदीवरील पातूर तालुक्यातील मोर्णा प्रकल्पही ओंसडून वाहत आहे. त्यामुळे एकाच वेळी मोर्णा प्रकल्पाचे आणि दगड पारवा प्रकल्पाचे पाणी शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला येवून मिळत असल्याने मोर्णा नदी दुथडी भरुन वाहात आहे. परिणामी मोर्णा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दगड पारवा प्रकल्पाचा फायदा काय?
दगड पारवा प्रकल्प शहराचे पुरापासून संरक्षण करण्या करीता बांधलेला आहे. दगड पारवा प्रकल्पाची मुळ साठवण क्षमता 21.19 दलघमी आहे. मात्र यातील 10 दलघमी पाणी पुराचे म्हणून नदीत सोडण्याचे धोरण आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या नोंदी या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा 10.19 दलघमी आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येतो. तुर्तास मोर्णा नदीवरील मोर्णा प्रकल्प ओसंडून वाहत आहे.तसेच दगड पारवा प्रकल्पाचे पाणी मोर्णा नदीत येत आहे. परिणामी नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोर्णा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्या नंतर दगड पारवा प्रकल्पातुन विसर्ग केला जात असेल तर दगड पारवा प्रकल्पाचा फायदा काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
ताशी 24 कोटी 39 लाख लिटरचा विसर्ग
पातूर तालुक्यातील मोर्णा नदीवरील मोर्णा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 23 सेंटीमिटरने 49.46 घनमिटर प्रतिसेकंद (49 हजार 460 प्रतिसेकंद) तर ताशी 17 कोटी 80 लाख 56 हजार लिटर तसेच दगड पारवा प्रकल्पातून 18.30 घनमिटर प्रतिसेकंद (हजार 300 लिटर प्रतिसेंकंद) तर ताशी 6 कोटी 58 लाख 80 हजार लिटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दगड पारवा आणि मोर्णा प्रकल्पातील विसर्ग मोर्णा नदीलाच येवून मिळत असल्याने तुर्तास मोर्णा नदीत ताशी 24 कोटी 39 लाख 36 हजार लिटर पाण्याचा विसर्ग होत असल्याने मोर्णा दुथडी भरुन वाहात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.