आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:प्रवासी निवारा कोसळून युवक ठार

पिंजरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर नजीक असलेल्या जमकेश्वर येथे प्रवासी निवारा कोसळल्याने एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

शनिवारी सायंकाळच्या वेळेस जमकेश्वर येथील चार ते पाच लोक प्रवासी निवाऱ्याखाली बसले होते. त्यातील चार व्यक्ती उठून गेले. त्यानंतर विकी वसंत कोकरे वय २२ हा युवक येथेच बसून होता. दरम्यान बस निवाऱ्याचा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला. ढिगाऱ्याखाली दबून गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या काही वेळातच पिंजर ठाणेदार अजय कुमार वाढवे यांनी घटनास्थळ गाठले. पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांना बोलावले. युवकाचा देह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. दरम्यान घन लोखंडी रॅम्प, रॉड, कटरच्या साहाय्याने २० मिनिटांत काँक्रीट तोडून मलब्याखाली दबलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. रेस्क्युसाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे व सहकारी मयूर सळेदार, सूरज ठाकूर, ज्ञानेश्वर वेरुळकार, महेश साबळे, महेश वानखडे यांनी सहकार्य केले. या वेळी ठाणेदार अजयकुमार वाढवे, पीएसआय बंडू मेश्राम, हेकाँ बेलोरकार, सरपंच ठोंबरे, उपसरपंच नितीन गवई, राकाँचे सतीश गावंडे, पं. स. सदस्य राधेश्याम खरतळे, सिंहासन जाधव आदी उपस्थित होते.

प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांडून रोष
पिंजरसह परिसरातील प्रवासी निवाऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. याबाबत नागरिकांनी यापूर्वी तक्रारी केल्या. मात्र, लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे युवकाचा जीव गेला. याचा येथील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला. पिंजर नजीक वडगाव फाटा येथील निवारा केंद्राचीही अवस्था बिकट आहे.

बातम्या आणखी आहेत...