आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:मुलीचे अपहरण, विनयभंग; आरोपीला पाच वर्षांची शिक्षा, दोघा भावांविरुद्ध न्यायालयात चालला होता खटला

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन पळवून नेणे आणि तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल बुधवारी ६ एप्रिलला देण्यात आला.

कपिल गणेश पडघन (रा. जुना आरटीओ रोड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २० डिसेंबर २०१८ रोजी अल्पवयीन मुलगी ही नेहमीप्रमाणे आईला सांगून शाळेत गेली होती. मात्र ती परत आली नाही. मुलीच्या वडिलांनी खदान पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिस उपनिरीक्षक सुकेशनी जमधाडे यांनी पीडित मुलीला मुंबईतील माटुंगा परिसरातून आरोपीसोबत ताब्यात घेतले व गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आरोपीविरुद्ध भांदविचे कलम ३६६ अ, ३६३, ३५४ ड व पोक्सो कायद्याचे कलम ११,१२ वाढवले. आरोपीला त्याचा भाऊ रुपेश रमेश पडघान याने पळून जाण्यासाठी मदत केल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक केली होती. तपासामध्ये निष्पन्न झाले होते की आरोपी कपिल हा पीडितेशी जवळीक साधून तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी करीत होता व तिच्या मनात शाळेची व घरच्यांची भीती घालत होता. त्यानंतर त्याने तिला पळवून नेले. या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सरकारपक्षाने गुन्हा सिद्ध होण्यासाठी सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी कपिल गणेश पडघान याला कलम ३६६ अ, ३६३ अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.

तसेच भादंविचे कलम ३५४ ड व पोक्सो कायद्याचे कलम ११,१२ अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तर आरोपी रूपेश रमेश पडघान याला पुराव्या अभावी निर्दोष सोडले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय कान्हेरकर व एलपीसी सोनु आडे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...