आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील 58 खुल्या जागा ताब्यात घेण्याचे मनपाचा आदेश:ओपन स्पेसवरील शाळा-व्यायाम शाळांना लागणार कुलूप?

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रातील ओपन स्पेस ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने महापालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. या ओपनस्पेस पैकी अनेक ठिकाणी शाळा, कॉलेज, व्यायाम शाळा असल्याने मनपाने जागा ताब्यात घेतल्यानंतर या शाळा, महाविद्यालय, व्यायाम शाळांना कुलुप लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरपालिका आणि त्या नंतर महापालिकेच्या कार्यकाळात ले-आऊट प्लॉटमधील मोकळ्या जागा विविध संस्थांना देण्यात आल्या. या ओपनस्पेसची चौकशी करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने केलेल्या पाहणीत 58 जागा आढळून आल्या. यापैकी काही संस्थाच्या लीज संपुष्टात आल्या आहेत. तर काही ठिकाणी अनधिकृतरित्या जागा ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच ज्या प्रयोजनासाठी जागा घेण्यात आली, त्या प्रयोजना ऐवजी दुसऱ्या कामासाठी या जागेचा उपयोग केला जात आहे, या बाबीही स्पष्ट झाल्या.

या अनुषंगाने प्रशासनाने ओपन स्पेस ताब्यात असलेल्या संस्थांसोबत प्रशासनाने चर्चा केली. तसेच कागदपत्रांची तपासणी केली. काही जागांवर लॉन, क्रिडा संकुल, शाळा, बालवाडी आहेत. या सर्वबाबींचा अभ्यास करुन नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. नियमानुसार ज्या भागातील जागा आहे, त्या भागातील ले-आऊट धारकांच्या संस्थेच्या ताब्यात जागा दिली जाते. त्यानुसारही कारवाई होण्याची शक्यता आहे. तुर्तास काही जागांचा ताबा घेण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहे. येत्या काही दिवसात जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली जाणार आहे.

शाळा, महाविद्यालय, वाचनालयांचे काय?

अनेक ओपनस्पेसवर शाळा, महाविद्यालय, वाचनालय, व्यायाम शाळा आदी बांधण्यात आल्या आहेत. या जागा महापालिकेने ताब्यात घेणे म्हणजे ओपनस्पेसच्या प्रवेशद्वाराला कुलुप लावावे लागेल. जागा ताब्यात घेतल्या नंतर संस्थेला या जागेचा वापर करता येणार नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, वाचनालय सुरु करता येणार नाही. एकीकडे एकही मुलगा-मुलगी शाळेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून िवविध योजना राबविल्या जातात तर आता जागा ताब्यात घेतल्याने या शाळाच बंद होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? अशी चर्चाही या निमित्ताने सुरु आहे.

मनपाच्या स्वत:च्या जागांकडे दुर्लक्ष

ओपन स्पेस व्यतिरिक्त महापालिकेच्या मालकीच्या शहरात अनेक ठिकाणी जागा आहेत. या जागांवर टोलेजंग इमारती तसेच काही जागांवर व्यवसाय केला जातो. मात्र या जागा ताब्यात घेवून अथवा जे नागरिक, व्यावसायिक या जागेत आहेत, त्यांना या जागा कशा प्रकारे देता येतील? याबाबत प्रशासनाने कोणतीही पाऊल उचलले नाही. विशेष म्हणजे या जागांमधून महापालिकेला कोट्यवधी रुपयाचा महसूल मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...