आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये वाढता कोरोना संसर्ग पाहता केंद्र आणि राज्य सरकारने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागालाही तयारी ठेऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी सायंकाळी झाली. जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली तरी कोरोना संसर्ग संपुष्टात आलेला नाही. अशातच आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान या संदर्भात वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यात मे २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात ज्या प्रमाणात रुग्णसंख्या होती तशी रुग्णसंख्या गृहीत धरून आवश्यक खाटा, ऑक्सिजन, औषधांची गरज लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. कोविड चाचण्यांसाठीच्या कीट, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी उपलब्ध डोसेस आदींचा आढावा घेतला. दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षात्मक खबरदारी घेणे गरजेचे आहे. हेल्थकेअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेऊन सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
२१० खाटांची व्यवस्था : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीनुसार सद्यःस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी अतिरिक्त खबरदारी म्हणून २१० खाटांची व्यवस्था रुग्णालयात आहे. गरजेनुसार ऑक्सिजन खाटांचीही उपलब्धता असल्याचे सांगण्यात येते.
दिवसभरात चार बाधित जिल्ह्यात बुधवारी कोरोना संसर्ग चाचणीचे ३३ अहवाल आले. त्यात चार बाधित रुग्ण आढळले असून, एका रुग्णास डिस्चार्ज दिला. बाधित रुग्णांत तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. हे रुग्ण मूर्तिजापूर व मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या आठ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६६०८३ झाली आहे.
तयारीच्या दिल्या सूचना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून जिल्ह्यातील सोयी सुविधांचा आढावा घेऊन मागणी मागितली आहे. लसीकरण आणि चाचण्यांसदर्भातही आढावा घेऊन कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी तयारी करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.