आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे प्रमुख सहाय्यक बडतर्फ:प्रकाश नागे यांच्यावर प्रशासनाची कारवाई; 'अग्रिम' वसुलीसाठी मालमत्तेच्या लिलावाचे आदेश

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत कोंडवाडा विभागात कार्यरत प्रमुख सहाय्यक प्रकाश नागे यांना अग्रिम रकमेचे समायोजन न करण्यासह विविध कारणांसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी 1 नोव्हेंबर रोजी सेवेतून बडतर्फ केले. तसेच त्यांनी उचललेली अग्रिम रक्कम वसुल करण्यासाठी त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही दिले. प्रशासनाच्या या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोंडवाडा विभागात कार्यरत असलेले प्रकाश नागे यांनी कोंडवाड्यातील म्हैस लिलाव करताना लिलावाच्या प्रक्रियेत संबंधित लिपिक यांना जाणिव पूर्वक अनभिज्ञ ठेवले होते. तसेच म्हशीची किंमत ठरविण्यासाठी नियमानुसार, प्रचलित पद्धतीनुसार कोणताही मापदंड ठेवला नव्हता तसेच वरीष्ठाचे मार्गदर्शनही घेतले नव्हते. म्हशीची हर्रासी मनमानी पद्धतीने घेतली होती.मह्शीची किमंत 85 हजार असताना ही म्हैस केवळ 9 हजारात विकण्यात आली. हा सर्व प्रकार गंभीर स्वरुपाचा असून कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने शिस्तीस अनुसरुन नसल्याचा ठपका प्रशासनाने नागे यांच्यावर ठेवला. या प्रकरणात प्रकाश नागे यांनी प्रशासनाकडे खुलासा सादर केला होता. मात्र हा खुलासा प्रशासनाने फेटाळून लावला. विभागीय चौकशीत प्रकाश नागे दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई प्रशासनाने केली.

या प्रकाराबरोबरच आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यावर विलंबाने दाखल होणे या कारणांसह महत्वाचे कारण म्हणजे प्रकाश नागे यांनी झोन कार्यालयात कार्यरत असताना मान्सुनपूर्व नाला सफाईच्या कामासाठी 25 लाख रुपयाची अग्रिम रक्कम उचलली होती. या उचललेल्या रकमेचे समायोजन न करणेही प्रकाश नागे यांना भोवले आहे. या रकमेचे समायोजन न केल्यामुळे त्यांच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या रकमेची वसुली करण्यासाठी त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करुन त्याचा लिलाव करावा आणि त्यातून या रकमेचा भरणा करावा, असे आदेशही आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकाश नागे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केल्याने भविष्य निर्वाह निधी वगळत त्यांना अन्य कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच सेवा निवृत्ती वेतनही मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...