आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन देशमुख यांनी कथन केला घटनाक्रम:गुजरातमध्ये गेल्यावर बंडाची कुणकुण लागली; सक्तीने रुग्णालयात भरती केले

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी मुंबईत गाडीत बसलाे. पालघरमार्गे गुजरातच्या सीमेवर प्रवेश केल्यानंतर काहीतरी गडबड असल्याची किंवा बंडासारखी कुणकुण लागली. ताेपर्यंत आम्ही सर्व आमदार सुरतला हाॅटेलमध्ये पाेहाेचलाे. हाॅटेलला पाेलिस छावणीचे स्वरूप आले हाेते. मी हाॅटेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाेलिसांनी रोखल्याने त्यांच्याशी वाद झाला. काही वेळाने मी बाहेर पडलाेच. मला पाेलिसांनी सक्तीने रुग्णालयात भरती केले. पहाटे मला पुन्हा हाॅटेलला साेडले आणि काही वेळेतच सर्व आमदारांना गुवाहाटी येथील हाॅटेलमध्ये आणण्यात आले. तेथून बुधवारी सकाळी मी सुटका करून घेतली आणि विमानाने नागपूर येथे पाेहाेचलाे, असा घटनाक्रम शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना कथन केला.

नितीन देशमुख म्हणाले, विधान परिषद निवडणुकीनंतर माझ्यासह काही मंत्री, आमदारांना शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी एका गाडीत बसण्यास सांगितले. अन्य मंत्री-आमदार असल्याने मीही गाडीत बसलाे. आम्ही महाराष्ट्राची सीमा पार करून गुजरात सीमेवर पाेहाेचताच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. सुरत येथील हाॅटेल परिसरात जवळपास ३०० पाेलिस हाेते. त्यांचे सर्वांवर लक्ष हाेते. मी हाॅटेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाेलिसांनी रोखल्याने त्यांच्याशी वाद झाला. रात्री मी तेथून बाहेर पडलाेच. माझ्या पाठीमागे पाेलिसांचा ताफाच आला. १०० पेक्षा जास्त पाेलिस असावेत. एका चाैकात पाेहाेचल्यानंतर मी मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. हे पाेलिस त्या वाहनांंनाही हुसकून लावत हाेते. साधरणत: दोन तास हा प्रकार सुरू हाेता. अखेर पाेलिसांनी माझी प्रकृती बिघडली नसतानाही मला सक्तीने रुग्णालयात भरती केले. मला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचण्यात आला. या ठिकाणी मला पकडून ठेवून इंजेक्शन्स टाेचण्यात आली. मला गुंगी येऊन झाेप येऊ नये यासाठी मी सातत्याने डाेळ्यावर पाणी शिंपडत हाेताे. बुधवारी पहाटे-पहाटे मला रुग्णालयातून सुरत येथील हाॅटेलमध्ये आणण्यात आले. तेथून आम्हाला गुवाहाटी येथे हलवण्यात आले. मात्र, तेथील हाॅटेलमधून बाहेर पडण्यासाठी मी हालचाली केल्या. अखेर तेथून बाहेर पडून नागपूरला आलो.

पत्रात मराठीत सही, मी इंग्रजीत सही करतो
देशमुख यांनी अकोल्यात पोहाेचल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही शिंदे यांच्या समर्थनात काढलेल्या पत्रावर सही केली का, असा प्रश्न विचारला त्यावर देशमुख यांनी आपण कुठलीही स्वाक्षरी केली नाही. मी इंग्रजीत सही करतो. मात्र, शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलेल्या पत्रात माझी सही मराठीत आहे.

संधी मिळताच सुटका करून घेतली
सुरत, गुवाहाटी येथील पाेलिस भाजपच्या दावणीला बांधल्यासारखेच वागत हाेते. सुरतमधील हाॅटेलमध्ये भाजपचे अनेक नेते हाेते. ते आमच्या आमदार आणि अन्य काहींशी चर्चाही करीत हाेते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पाेलिसांच्या तावडीतून, हाॅटेलमधून कसे बाहेर पडता येईल यासाठीच मी प्रयत्न करीत हाेताे. संधी मिळताच तेथून सुटका करून घेतली.

अनेक जण बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत
शिंदे यांच्या गटातून ८-१० आमदार बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत आहेत. मात्र हाॅटेलमध्ये पाेलिस, सुरक्षा रक्षक माेठ्या संख्येने आहेत. त्यांच्या तावडीतून सुटणे सहज शक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...