आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहान मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असल्याने त्यांना कोरोनापासून किंवा कोरोनामुक्तीनंतरही धोका नाही असा समज असेल तर सतर्क व्हा. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे निरीक्षण आहे. लक्षणांवर वेळीच उपचार न घेतल्यास कोविड मुक्तीनंतर ‘कावासाकी सिंड्रोम’ हा कोविडनंतरचा आजार होण्याचा धोका आहे. मुंबई, नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी कावासाकीचे रुग्ण आढळले होते. इतरही भागात ती असण्याची शक्यता असल्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून लहान मुलांना वाचवा, असे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे. लहान मुलांमधील कोरोना या विषयावर ‘दिव्य मराठी’ने काही बालरोगतज्ञांशी संवाद साधला.
अकोल्यातील डाॅ. अनुप चौधरी यांच्या मते, कोविड संसर्गाच्या प्रारंभी लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण कमी आढळल्याने कोरोना केवळ वयस्करांना लक्ष्य करतो असा समज झाला. मात्र लहान मुलांमध्येही हा आजार वाढत असून लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. कोरोनामुक्तीनंतर सर्वच वयोगटातील नागरिकांना प्रकृतीनुसार दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. यात लहान मुलांची प्रतिकारशक्ती विकसित नसल्याने त्यांना जपणे अधिक महत्त्वाचे ठरते. कावासाकीचे विशेष रुग्ण सध्या दिसत नसले तरी कोविडनंतर अशक्तपणा जाणवतो. वेगळ्या प्रकारचा दाह शरीरात निर्माण होतो. त्याचा विविध अवयवांवर परिणाम होत असतो. त्यातीलच ‘कावासाकी’ हा एक प्रकार आहे. हा प्रत्येकालाच होऊ शकतो असे नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे (आयएमए) माजी अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
पुरळ,डोळे लाल,पाय सुजणे कावासाकी आजाराची लक्षणे : अनेक ठिकाणी कोरोनानंतर मुलांना हा आजार झाल्याचे निदर्शनास आहे. त्यामध्ये रुग्णात तीव्र ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचेवर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, पाय सुजणे आणि ओठांना भेगा पडणे ही लक्षणे आढळून आली आहेत. १४ ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना हा आजार होऊ शकतो.
कोविड रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण : अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयाच्या माहितीनुसार एकूण बाधित रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण हे ५ टक्क्यांच्या जवळपास सांगितले जाते. तर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या मते लहान मुलांच्या फारशा चाचण्या होत नसल्याने प्रमाण काढणे कठीण आहे. तरी ज्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अशांच्या संपर्कात आल्याने ज्या लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, पोटदुखी व हगवण सारखी लक्षणे आहेत.
हे आजार उद्भवण्याची शक्यता
कोरोनातून बरे झाल्यावरही काही लक्षणे असल्यास दुर्लक्ष करून नये. कोरोना पश्चात न्यूमोनिया, श्वसनसंस्थेच्या तक्रारी, हृदयविकार, रक्तदाब, किडनीचे आजार होतात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती विकसित नसल्याने त्यांना कोरोनानंतर हे आजार उद्भवण्याची शक्यता इतर वयोगटाच्या तुलनेत अधिक असू शकते. - डाॅ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे
मुलांना दूर ठेवा
पालक कोरोनाबाधित असतील तर त्यांनी मुलांना हाताळू नये. मुलांचा लाड करणे, पापा घेणे आदी बाबी टाळायला हव्या. घरातील एकही व्यक्ती बाधित असेल तरी त्यांनी लहान मुलांपासून लांब राहावे, अन्यथा मुलांच्या माध्यमातून प्रसार वाढण्याचा धोका संभवतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.