आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाखरपुडा झाल्यानंतर लग्नाची वाट न पाहता आपल्या उपवधूला पळवून नेणाऱ्या उपवराविरूद्ध अकोट फैल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुलगी ही अल्पवयीन आहे. नोव्हेंबरमध्ये १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न ठरले होते. अकोट फैलातील एका अल्पवयीन मुलीसोबत अमरावती येथील मोचीपुऱ्यातील एका युवकाची सोयरीक जुळली होती. लग्न करण्यासाठी ती १८ वर्षाची असणे आवश्यक असल्याने आधी साखरपुडा उरकून घेऊ व नंतर ती १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर लग्न करू असे सामंजस्याने दोघांच्या कुटुंबियांकडून ठरले होते. त्यानुसार २७ जानेवारीला त्यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हापासून मुलीचे व युवकाचे मोबाइलवरून बोलणे सुरू झाले.
२५ मार्चला मुलीची प्रकृती चांगली नव्हती. त्या बहाण्याने युवक हा २८ मार्चला तिच्या घरी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आला होता. चहापाण्यानंतर मुलीची आई काम करीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त निघून गेली व दोन तासानंतर परत आली असता मुलगी आणि होणारा जावई दोघेही घरी नव्हते. ते शहरात फिरायला गेले असतील म्हणून सायंकाळपर्यंत त्यांची वाट पाहिली. मात्र ते घरी आले नाही आणि त्यांचा मोबाइलही बंद असल्याने त्यांची शोधाशोध सुरू केली असता रात्री युवकाच्या बडनेरा येथील बहिणीने मुलीच्या आईला दोघेही आपल्याकडे असल्याचे सांगितले आणि फोन बंद केला.
काळजीपोटी मुलीची आई बडनेरा येथे गेली असता तिला युवकाच्या बहिणीचे घर न सापडल्याने ती अमरावती येथील युवकाच्या घरी गेली असता युवकाच्या आईने दोघेही घरी आले नसल्याचे सांगितले. अखेर मुलीच्या आईने अकोट फैल पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली असता पोलिसांनी युवकाविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.