आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रेल्वे कॉलनीजवळील एकता नगर झोपडपट्टी वासियांचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. दरम्यान रेल्वेने ही जागा खाली करून देण्याची नोटीस रहिवाशांना दिल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून येथे राहणाऱ्या २०० कुटुंबीयांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली.
एकता नगरातील २०० कुटुंबीय १९३६ पासून येथे वास्तव्यास आहेत. एकता नगर झोपडपट्टीजवळ मध्य रेल्वेचे लोकोशेड आहे. नगरपरिषद हद्दीतील एकता नगर झोपडपट्टीवासी राहात असलेल्या जागेवर रेल्वे मालकीचा हक्क सांगत एकता नगर झोपडपट्टीवासीयांना १५ दिवसात जागा खाली करून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे रहिवासी २०० कुटुंबियांनी कोणाकडे पाहावे ? असे म्हटले जात आहे. एकता नगर झोपडपट्टीत ८६ वर्षापासून दोनशे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. शासनाने २००२ च्या परिपत्रकानुसार वर्षोनुवर्षे राहणाऱ्या जागेवरच त्यांना कायमस्वरूपी करण्याचे परिपत्रक असल्यावरही एकतानगर वासियांना घर वाचवण्याकरता भटकंती करावी लागत आहे. याचे कायमस्वरूपी समाधान व्हावे करता ३१ मार्चला सर्वपक्षीय पुढाकार घेऊन भाजपचे तालुका उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, माजी नगराध्यक्षा मोनाली गावंडे, माजी नगरसेविका प्रतीक्षा वसुकार, संजय नाईक, वसूकार, रितेश सबाजकार यांच्या उपस्थितीत एकता नगर नगरवासीयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून पुनर्वसनासाठी जागा देण्याची मागणी केली.
प्रशासनाने एकता नगरा राहणाऱ्या दोनशे कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाच्या जागेवरून इतर जवळच्या शासकीय जागेवर पुनर्वसन करण्याकरता निवेदन दिले.प्रशासनातर्फे पंधरा दिवसात जागा खाली करण्याचे आदेश प्राप्त झाल्यामुळे एकता नगर वासियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे मुख्यमंत्री, पुनर्वसनमंत्री व पालकमंत्री यांनी लक्ष घालून एकता नगर वासियांचा प्रश्न सोडविण्याची सर्वपक्षीय मागणी केली. यावेळी सुनील सोनवणे, दीपक डोंगरदिवे, भास्कर शंभरकर, संजय शेलार, कृपागत बोरकर, बाळू कांबळे,सागर काळे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.