आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा योजना पोहचली मंत्रालयात!:मजिप्राच्या ग्रीन सिग्नलनंतर उद्या अमृत योजना समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरीचे भवितव्य

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाणी पुरवठा योजनेच्या ७३८.४८ कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मजिप्राने तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर आता मंत्रालयात या प्रस्तावाबाबत अमृत योजनेच्या समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे मंगळवारी दि.१४ रोजी होणाऱ्या या बैठकीत योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.

दुसऱ्या टप्प्यात १२ जलकुंभ, दोन जलशुद्धीकरण केंद्रासह विविध कामे केली जाणार आहेत. अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या मुळ हद्दीत (२८ चौरस किलोमिटर क्षेत्रात) आठ जलकुंभ, जुन्या व क्षतीग्रस्त जलवाहिन्या बदलुन नविन जलवाहिन्या, ज्या भागात जलवाहिन्या नाहीत, त्या भागात जलवाहिन्या अंथरण्यात आल्या. त्याच बरोबर जलशु्द्धीकरण केंद्रातील विविध दुरस्त्या तसेच पाच पंप घेण्यात आले. यासह विविध कामे करण्यात आली. ही कामे अंतिम टप्प्यात असताना अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु करण्यात आली होती.

दुसऱ्या टप्प्यात बहुतांश कामे ही हद्दवाढ झाल्या नंतर समाविष्ट झालेल्या २१ गावांमध्ये केली जाणार आहेत. यात जलवाहिनी अंथरणे, जलकुंभ बांधणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, स्कॉडा अ‌ॅटोमोशन यंत्रणा राबविणे आदी विविध कामे केली जाणार आहे.

वान मधील स्थगिती कायम

महापालिकेला वान प्रकल्पात २४ दशलक्ष घनमिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र या आरक्षणाला विरोध झाल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये निवडणुकीपूर्वी स्थगिती दिली होती. ही स्थगिती अद्याप उठवलेली नसताना वान प्रकल्पात पाणी आरक्षण मिळेल, असे गृहित धरुन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, हे विशेष.

दोन्ही स्थगिती उठण्याची शक्यता?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बाळापूर तालुक्यातील ६९ खेडी पाणी पुरवठा योजनेसाठी वान प्रकल्पात आरक्षित केलेल्या ४ दशलक्ष घनमिटर पाण्याला स्थगिती दिली. या योजनेत ९३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. राजकीय कुरघोडीत या दोन्ही आरक्षणांना स्थगिती देण्यात आली. आता राजकीय कुरघोडीचा फायदा घेतच ६९ खेडी पाणी पुरवठा योजना व अकोला पाणी पुरवठा योजनेवरील वान प्रकल्पातील स्थगिती उठण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...