आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांविराेधात भाजप रस्त्यावर:संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध; जिल्ह्यात 25 ठिकाणी आंदाेलन​​​​​​​

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपने मंगळवारी दुपारी रस्त्यावर उतरत निषेध केला.

यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमाेर एकत्र येत भाजपकडून घाेषणा देण्यात आल्या. तसेच जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध नाेंदविण्यात आला. भाजपकडून जिल्ह्यामध्ये 25 ठिकाणी आंदाेलन करण्यात आले.

काही दिवसांपुर्वी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केले हाेते.‘आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही जण धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केले नाही. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. संभाजी महाराजांचा उल्लेख हा धर्मवीर असा करू नये, असे ते म्हणाले हाेते. दरम्यान अजित पवार यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध नाेंदवला आंदाेलनात प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, बळीराम सिरस्कार, महापौर अर्चना मसने, अनुप धोत्रे , विजय मालोकार, माधव मानकर, संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, आदी सहभागी झाले.

भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

आंदाेलनाच्यानिमित्ताने भाजपमधील गटबाजीही समाेर आली आहे. साेमवारी भाजप काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ (नेहरु पार्क ) एकत्र येत रास्ता राेकाे आंदाेलन केले हाेते. यात प्रामुख्याने माजी पालकमंत्री आमदार डाॅ. रणजित पाटील यांचे समर्थक म्हणून ओळख जाणारे माजी महानगराध्यक्ष तथा प्रदेश सदस्य डाॅ. अशाेक ओळंबे हे सहभागी झाले हाेते.

जिल्ह्यात खा. संजय धाेत्रे-आ. रणधीर सावरकरविरूद्ध डाॅ. पाटील हे दाेन गट आहेत. मध्यंतरी गटबाजी समाेर आली नव्हती. सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून, डाॅ. पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. अशातच ही गटबाजी पुन्हा उफाळून आल्याने भाजपमध्ये अंतर्गत राजकीय वातावरण तापले आहे.

अजित पवारांनी माफी मागावी

भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो, ‘अगर इस देश में रहेना हाेगा वंदेमातरम कहेना हाेगा’, ‘शर्म कराे शर्म कराे अजित पवार शर्म कराे’ अशा घाेषणा दिल्या. आंदाेलकांनी हातात फलक घेत विरोधा पक्ष नेते अजित पवार यांचा निषेध नाेंदवला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा आणि हाैतात्माचा अपमान केल्याने अजित पवार यांनी जाहीर मागावी, अशी मागणी फलकावर करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...