आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅनॉल मार्गाच्या खडीकरणाचे काम महिना अखेर सुरु होणार
डाबकी रोड, जुना बाळापूर रोड जोडला जाणार, नागरिकांना मिळणार दिलासा
प्रतिनिधी । अकोला
जुने शहरातील महत्वपूर्ण असलेल्या दोन किलो मिटर कॅनॉल मार्गाच्या खडीकरणाचे काम मार्च महिना अखेर सुरु केले जात आहे. यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. खडीकरणामुळे डाबकी रोड आणि जुना बाळापूर रोड जोडला जाणार आहे. त्यामुळे डाबकी रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होवून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मोर्णा प्रकल्प १९७० साली अस्तित्वात आल्या नंतर सिंचनासाठी कालवे तयार करण्यात आले. मोर्णा प्रकल्पातील एक कालवा डाबकी रोड आणि जुना बाळापूर रोड मधुन गेलेला आहे. यातून शेतकरी सिंचनासाठी पाणी घेत होते. मात्र १९९० नंतर शहरात अनेक उपनगरे वसली. यात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने उपनगरे वसल्याने सिंचन कमी झाले. परिणामी पाटबंधारे विभागाने कॅनाल मध्ये पाणी सोडणे बंद केले. विशेष म्हणजे कॅनॉलच्या दोन्ही बाजुने गुंठेवारी अथवा प्लॉटचे ले-आऊट करताना कॅनॉलचा रस्ता म्हणुन दर्शविण्यात आला. त्यामुळे रस्त्यासाठी जागा सोडल्या गेली नाही. पुढे घरे वाढल्याने या मार्गाचा वापर वाढला. मात्र हा मार्ग मातीचा होता (अद्यापही मातीचाच आहे) त्यामुळे या रस्त्याचा वापर पावसाळ्यात करता येत नाही. तसेच अनेकांनी सांडपाणी सोडल्याने या मार्गात चिखल साचतो. नागरिकांनी या रस्त्याच्या खडीकरणाची मागणी केली. मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी परत मागीतल्या. अनेक वर्ष न्यायालयात प्रकरण चालल्या नंतर मार्गाचा प्रश्न निकाली निघाला. त्यानंतर महापालिकेने विकास आराखड्यात कॅनॉल ऐवजी रस्ता असा उल्लेख करुन शासनाकडून मंजुर करुन आणला. त्यानंतर पाटबंधारे ना-हरकत प्रमाणपत्र दिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने खडीकरणाचा मार्ग मोकळा झाला. या खडीकरणासाठी तीन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रशासनाने खडीकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर आता केवळ कामाचे आदेश देणे राहिलेले आहे. येत्या काही दिवसात कामाचे आदेश दिले जाणार असल्याने या महिना अखेर या खडीकरणाचे काम सुरु होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.