आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आवतन!:बेफिकिरी बिनधास्त वावरणाऱ्या नागरिकांवर उरला नाही प्रशासनाचा धाक ना वचक

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गांधी रोड, सिंधी कॅम्प, जयहिंद चौक, कौलखेड, टिळक रोड, गोरक्षण रोडवर गर्दी

शहरातील बाजारपेठेत होणारी अनियंत्रित गर्दी, बेजबाबदार वाहनचालक, वाहतुकीची कोंडी, बँका, दुकाने आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुरक्षात्मक जबाबदारीकडे होणारे दुर्लक्ष या सर्व प्रकारांवर यंत्रणेचा कोणताही नसलेला वचक या बाबी जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आवतन देण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्यानंतर संसर्ग कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. वेगवेगळ्या टप्प्यावर निर्बंध हटवण्यात येत असतानाच सार्वजनिक ठिकाणी अत्यंत बेजबाबदारपणे वावरणाऱ्यांची गर्दी वाढत आहे.

विविध प्रकारची दुकाने खुले झाल्याने गांधी रोड, सिंधी कॅम्प, जयहिंद चौक, कौलखेड, टिळक रोड, गोरक्षण रोड, सिव्हिल लाइन, जठारपेठ, रामदासपेठ आदी परिसरात नागरिकांची गर्दी दिसत आहे. यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केलयानंतर पेरणीच्या तोंडावर बाजारपेठा सुरू झाल्याने बियाणे आणि खत खरेदीसाठी अकोला शहरासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी, नागरिकांची गर्दी होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांच्या टाळेबंदी नंतर बाजारात गर्दी होणे साहजिक आहे. मात्र सुरक्षित अंतर न राखता तसेच सुरक्षा साधनांचा वापर न करता एकत्र येणाऱ्या नागरिकांची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते, असा धोका वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

शिथिलतेचा घेताहेत गैरफायदा
शहरात ठिकठिकाणी नागरिकांकडून शिथिलतेचा गैरफायदा घेतला जात आहे. बाजार परिसरात खरेदी करताना व्यावसायिक, विक्रेत्यांकडून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. मात्र यावर पोलिस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाचा कोणताही वचक असल्याचे दिसून येत नाही. अनेक जण अनावश्यक बाहेर पडताना दिसत आहेत.

दुसरी लाट विसरू नका
जिल्ह्यात आढळणारे कोरोना रुग्ण कमी झाले असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. दुसऱ्या लाटेत शेकडो रुग्णांचे बळी जाऊन अनेक कुटुंब उघड्यावर आले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत झालेली हानी न विसरता नागरिकांनी कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरू नये, असे आवाहन जीएमसी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेकरिता जिल्ह्यात उपाययोजना राबवा
कोविड-१९ ची तिसरी संभाव्य लाटेमध्ये बालकांसह कोरोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपचार सुविधा, बेड, ऑक्सिजन, लसीकरण यासारख्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधितांना दिले. जिल्हा नियोजन सभागृहात कोविड संदर्भात महसूल विभागाची अाढावा बैठक झाली. यात संभाव्य तिसऱ्या लाटेवर चर्चा करण्यात अाली. ही लाट राेखण्यासाठी अावश्यक त्या उपाय याेजना करण्याचा अादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, अभयसिंह मोहिते तसेच सर्व तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तालुकानिहाय कोविडसंबंधी पूर्वतयारी करून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार अाहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे कामे पूर्ण झाल्याची खातरजमा करावी, बालकांसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर बेड राखीव ठेवावे, असा अादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

लसीकरणावर भर द्या
४५ वर्षावरील प्रत्येक दुकानदार, विक्रेते, फेरीवाले व व्यापाऱ्यांनी काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरण अथवा चाचण्या केल्याची खातरजमा करा व लसीकरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहित करा, असा अादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शासनाद्वारे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी २१ जूनपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण न झालेल्या व्यक्तीने २० जूनपूर्वी लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...