आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीसाठी रविवारी हाेणाऱ्या मतदानासाठी शनिवारी दुपारी संबंधित अधिकारी-कर्मचारी हे मतदान प्रक्रियेसाठी आपआपल्या ठिकाणी रवाना झाले. निवडणुकीत एकूण 1 हजार 732 जागांसाठी 4 हजार 803 उमेदवार रिंगणात आहेत. तर 3 लाख 8 हजार 317 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
तसेच एकूण 832 मतदान केंद्र उभारण्यात आली असून, 179 केंद्र संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी 3 हजार 876 कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी मतदान हाेणार असून, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
असे आहेत उमेदवार
ग्रा.पं. निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी व उमेदवारी माघारीनंतर जिल्ह्यात आता तेल्हारा तालुक्यात 23, अकोट- 36, मूर्तिजापूर- 51, अकोला- 54, बाळापूर 26, बार्शीटाकळी- 47 तर पातूर- 28 अशा एकूण 265 ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे. यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या 679 असून त्यातून 1474 सदस्यांची निवड हाेणार आहे.
571 सदस्य हे अविरोध
ग्रा.पं.निवडणुकीत एकूण 571 सदस्य हे अविरोध झाले आहेत. 29 ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झाला नव्हता. जिल्ह्यात एकूण अविरोध प्रभागांची संख्या 138 आहे. सरपंच वगळता 5 ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य अविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा-1, अकोट-1, अकोला-3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सरपंचपदासाठी 258 ठिकाणी निवडणूक
सरपंचपदासाठी 258 जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार अविरोध ठरले असून चार ठिकाणी सरपंचपदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही.
असे आहेत मतदार
ग्राम पंचायत निवडणुकीत एकूण 3 लाख 8 हजार 317 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 1 लाख 61 हजार 659 पुरुष तर 1 लाख 46 हजार 654 महिला व 4 इतर मतदारांचा समावेश आहे.
तालुका मतदार संख्या
तेल्हारा- 31134
अकोट 52079
मूर्तिजापूर - 58684
अकोला - 56924
बाळापूर - 27185
बार्शीटाकळी - 48332
पातूर - 33962
दिव्यांग - 2599
अशी आहे यंत्रणा कार्यरत
रविवार व मंगळवारी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी जारी केले आहेत. नमुद तारखेस त्या ठिकाणांचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.