आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले.
पारस येथील महात्मा फुले विद्यालयाजवळ समर्थ बाबुजी महाराज संस्थानात रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी आरती झाल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही जण सुरक्षेसाठी या परिसरातील शेडखाली थांबले. मात्र या शेडवर कडुनिंबाचे मोठे झाड कोसळल्याने त्यात उभे असलेले सुमारे 50 च्या वर भाविक-ग्रामस्थ अडकले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
कर्मचारी बचावकार्यासाठी सरसावले
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बाळापूर-पारस मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. जखमींना रुग्णवाहिका व अन्य वाहनांनी रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामस्थ, पोलिस व अन्य सरकारी यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी बचावकार्यासाठी सरसावले.
मेडिकल कॉलेजमध्ये उपचार
शेडखालून 30 ते 35 जखमींना बाहेर काढण्यात आले. या सर्वांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी काहींना किरकोळ मार लागलेला होता. त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. तर 29 जणांना प्रचंड मार लागला असून त्यांच्यावर अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
नागरिकांची प्रचंड गर्दी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंदिर परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. काही लोक रुग्णालयात जाऊन आपले नातेवाईक तर भरती झाले नाहीत ना याची खातरजमा करून घेत होते. परिसरात रात्रभर आक्रोशाचे स्वर ऐकू येत होते.
अशी आहेत मृतांची नावे
अतुल आसरे (वय 32 वर्ष, बाभूळगाव जि. अकोला), विश्वनाथ तायडे (वय 35 वर्ष, सोनखेड), पार्वताबाई महादेव सुशील (वय 65 वर्ष आलेगाव बाजार), भास्कर आंबीलकर (वय 60 वर्ष अकोला), उमा महेंद्र खारोडे (वय 50 वर्ष, भुसावळ) अशी मृत व्यक्तींची नावं असून काहींचे अद्याप नावे कळू शकले नाहीत. तरीही यातील मृतकांची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून दोन्ही पुरुष असून त्यांची वय 35 आणि 45 अशी आहे. बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जुंबळे यांनी ही माहिती दिली आहे.
अशी आहेत जखमींची नावे
कोमल जाधव, रूपाबाई तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, मुरलीधर अंबाकर, नारायण, भागीरथाबाई गुलाबराव लांडे, कौशल्याबाई इंगळे, सुप्रदाबाई वानखड़े, दिवाकर मधुकर इंगळे, सुनंदा रामदास पुंडे, शामराव आठवले, गणेश तायडे, लक्ष्मण बुटे, रामाभाऊ वासुदेव कसूरकार, रुखमा शालिग्राम तायडे, सुरेखा प्रकाश कांबळे, संकेत लक्ष्मण बुटे यासह अन्य लोक जखमी झाले आहेत.
कशी घडली संपूर्ण घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पारस हे गाव आहे. येथे बरड परिसरात बाबूजी महाराज संस्थान म्हणजेच मंदिर आहे. आज रविवार असल्याने सायंकाळी आरतीसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी राहते. संस्थान परिसरात आज रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास आरती सुरू झाली. या मंदिरा बाहेर टिनाचं मोठे शेड आहे. त्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
पारस परिसरातील पाऊस सुरू झाला, रस्त्यावरील येजा करणारे लोकांनी पावसापासून वाचण्यासाठी टिन शेडचा आसारा घेतला. तसेच दर्शनासाठी आलेले लोक इथं जमलेले होते. त्यामुळ या टिन शेड खाली 40 ते 50 लोक उपस्थित होते. दरम्यान अचानक पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या संस्थांना लागून म्हणजेच मधोमध असलेले मोठे कडुलिंबाचं झाड अचानक उन्मळून मंदिराच्या टिनाच्या शेडवर कोसळले. यावेळी शेडवर पूर्णपणे झाड़ पड़ल्याने त्याखाली पुर्णतः तुटले. अन् या खाली चाळीस ते पन्नास लोक पूर्णपणे दबले गेले. दरम्यान पाऊस आणि वारा यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत होता. पण जेसीबी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तसेच बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने शेड खाली दबलेल्या असलेल्या लोकांना बाहेर काढून बचवण्यात आले.
उपमुख्यमंत्र्यांकडून दखल
देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत अकोला जिल्ह्यातील घटने संदर्भात म्हणाले की, पारस इथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. 'मी' त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत.
आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.