आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या तापमानाने रविवारी, ३ एप्रिलला यंदाच्या कमाल तापमानाचा विक्रमी आकडा गाठला. दिवसभरात ४४. ० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. हे तापमान देशात सर्वाधिक होते. जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांत सातत्याने अकोल्याचा समावेश राहत आहे. रविवारी अकोल्याचे तापमान देशात सर्वाधिक तर जगात नवव्या स्थानी होते.
मार्चनंतर एप्रिलमध्ये उन्हाची प्रखरता अधिक जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्हे ४० ते ४१ अंश सेल्सियसपेक्षा पुढे राहत आहेत. यामध्ये अकोल्याचे पहिले स्थान सातत्याने टिकून राहत आहेत. दरम्यान हवामान अभ्यासकांकडून उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १५ एप्रिलनंतर तापमानाचे आकडे कहर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित होत असून, आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. उष्माघाताचा धोका वाढल्याने अतिजोखमीतील नागरिकांना सुरक्षात्मक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
भाजीपाला पिकांना फटका
जिल्ह्यात तापमान वाढू लागल्याने फळे तसेच भाजीपाला पिकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. भाजीपाला पिके सुकू नये म्हणून शेतकऱ्यांची ओलिताची कसरत वाढली आहे. तापमान वाढीमुळे भाजीपाल्याची आवक घटली. परिणामी दरवाढही झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक बागायतदार उन्हाची पर्वा न करता पीक काढत आहे. सद्यःस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असल्याने बाष्पीभवनातही वाढ होते. परिणामी पाण्याची मागणीही वाढते. म्हणून उन्हाळी भाजीपाला पिकाला पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी ओलीत केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी वीज किंवा पाण्याची समस्या आहे तेथे दुपारी किंवा रात्रीही ओलित केले जात आहे.पाण्याची उपलब्धता आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला जसे भेंडी, गवार, टिंडा, चवळी, काकडी, लौकीची लागवड सुरू करावी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून देण्यात येत आहे.
कांदा पिकावर फवारणी
कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोग आढळताच क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १२ मि.ली + मॅन्कोझेब २५ ग्रॅम + स्न्डोव्हीट स्टीकर ५० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे तज्ज्ञ सांगतात.
या घटकांनी काळजी घेण्याची आवश्यकता
जिल्ह्यातील तापमान वाढत असून, अतिजोखमीच्या गटातील लोकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व्यक्ती, लहान बालके, मुले, स्थूल व्यक्ती, पुरेशी झोप न झालेल्या व्यक्ती, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असणारे लोक, काही विशिष्ट औषधी घेत असलेले लोक, बेघर लोक इत्यादी गटांतील लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.