आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामायलेकींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सह जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील जे. शर्मा यांच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल बुधवारी देण्यात आला.
सोनू शामराव कांबळे (वय 24, रा. शास्त्री नगर सिंधी कॅम्प अकोला) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 3 वाजता महिला ही तिच्या घरात अल्पवयीन मुलीसह असताना आरोपी सोनू शामराव कांबळे याने घराच्या गेटला दगड मारले व गेट लोटून आतमध्ये घुसला. त्याच्याजवळ पेट्रोलने भरलेली बॉटल होती. त्याने ती बॉटल महिलेल्या अंगावर फेकून मारली. मात्र, महिलेने ती चुकवली. त्यानंतर घरातील सामानाला लाथा मारून अस्ताव्यस्त केले व महिलेशी लगट करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. हे पाहून लहान मुलगी रडत होती. तिलासुद्धा पकडून त्याने गेटपर्यंत ओढत नेत असताना महिलेने आपल्या मुलीची त्याच्यापासून सुटका केली आणि घराचा दरवाजा बंद केला.
काही वेळाने महिला ही खदान पोलिस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी गेली असता दरम्यान आरोपी पुन्हा घरासमोर आला होता. महिलेच्या अशा तक्रारीवरून खदान पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस उपनिरीक्षक योगिता ठाकरे यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली व तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षपुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सोनु शामराव कांबळे याला महिला व तिच्या मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी भादंविचे कलम 354 व 8 पोक्सो अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी, 294भादंवि अंतर्गत तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दंड न भरल्यास 15 दिवसांची शिक्षा भादंवि कलम 323 अंतर्गत सक्तमजुरीची एक महिना शिक्षा तसेच भांदवि 452 नुसार तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सर्व शिक्षा आरोपीला सोबतच भोगाव्या लागणार आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील दीपक गोटे यांनी प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच मपोशि प्रिया शेगोकार यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.