आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:महत्वपूर्ण कॅनॉल मार्गाच्या खडीकरणाचे काम सुरु होणार, मनपाने मोजली जागा; काहींच्या आवारभिंती जाणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने शहरातील महत्वपूर्ण असलेल्या दिड किलो मिटर कॅनॉल मार्गाच्या खडीकरणाचे काम येत्या काही दिवसात सुरु होत आहे. महापालिकेने रस्त्याची मोजणी केली असून काही नागरिकांच्या आवारभिंती काढाव्या लागणार आहे. रस्त्याच्या खडीकरणासोबतच एका बाजूने कॉक्रीट नाल्याचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मोर्णा प्रकल्प 1970 साली अस्तित्वात आल्या नंतर सिंचनासाठी कालवे तयार करण्यात आले. मोर्णा प्रकल्पातील एक कालवा डाबकी रोड आणि जुना बाळापूर रोड मधुन गेलेला आहे. यातून शेतकरी सिंचनासाठी पाणी घेत होते. मात्र 1990 नंतर शहरात अनेक उपनगरे वसली. यात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने उपनगरे वसल्याने सिंचन कमी झाले.

परिणामी पाटबंधारे विभागाने कॅनाल मध्ये पाणी सोडणे बंद केले. विशेष म्हणजे कॅनॉलच्या दोन्ही बाजुने गुंठेवारी अथवा प्लॉटचे ले-आऊट करताना कॅनॉलचा रस्ता म्हणुन दर्शविण्यात आला. त्यामुळे रस्त्यासाठी जागा सोडल्या गेली नाही. पुढे घरे वाढल्याने या मार्गाचा वापर वाढला. मात्र हा मार्ग मातीचा होता (अद्यापही मातीचाच आहे) त्यामुळे या रस्त्याचा वापर पावसाळ्यात करता येत नाही. तसेच अनेकांनी सांडपाणी सोडल्याने या मार्गात चिखल साचतो.

नागरिकांनी या रस्त्याच्या खडीकरणाची मागणी केली. मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी परत मागीतल्या. अनेक वर्ष न्यायालयात प्रकरण चालल्या नंतर मार्गाचा प्रश्न निकाली निघाला. त्यानंतर महापालिकेने विकास आराखड्यात कॅनॉल ऐवजी रस्ता असा उल्लेख करुन शासनाकडून मंजुर करुन आणला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या नंतर खडीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता.

या अनुषंगानेच जुना बाळापूर रोड ते डाबकी नाका या दरम्यान रस्त्याच्या खडीकरणासाठी रस्त्याची रुंदी मोजण्यात आली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती विलास शेळके, माजी नगरसेवक तुषार भिरड आदी उपस्थित होते. येत्या काही दिवसात खडीकरणाचे काम सुरु होईल. त्यामुळे या पावसाळ्यात नागरिकांना या मार्गाने जाणे-येणे करता येणार आहे.

नागरिकांना मिळणार दिलासा

खडीकरणामुळे डाबकी रोड आणि जुना बाळापूर रोड जोडला जाणार आहे. त्यामुळे डाबकी रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होणार असून या भागातील नागरिकांना अॅटोरिक्शा सेवाही उपलब्ध होवू शकणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आवारभिंती होणार जमिनदोस्त

अनेकांनी कॅनॉल मार्गावरच आवारभिंती घेतल्या आहेत. आता मोजणी झाल्याने काही नागरिकांच्या आवारभिंती जमिनदोस्त होतील. तसेच रस्त्याच्या बाजुने नाल्याचे बांधकाम केले जाणार असल्याने सांडपाण्याची समस्याही निकाली निघणार आहे.