आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत कार्यरत 113 मानसेवी कर्मचारी 26 डिसेंबर पासून विना आदेशाने जोखमीची तसेच महत्वाची कामे करत होते. मात्र प्रशासनाने अखेर 28 डिसेंबर रोजी दोन महिन्याच्या कामाचे आदेश दिले. यापूर्वी केवळ एक महिन्याच्या कामाचे आदेश देण्यात आले होते.
महापालिका अस्तित्वात आल्यापासून अतिक्रमण विभाग, अग्निशमन, पाणी पुरवठा, बांधकाम, नगररचना आदी विविध विभागात मानसेवी कर्मचारी कार्यरत आहेत. यात अभियंत्यासह संगणक चालक, सुरक्षा रक्षक आदींचा समावेश आहे.
या मानसेवी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी दोन दिवसाचा खंड देवून कामाचे आदेश दिले जातात. काही कर्मचारी 18 ते 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कायम आस्थापनेवर घेण्याबाबत आता पर्यंत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अथवा आयुक्तांनी पुढाकार घेतला नाही. मात्र अनेकदा सहा महिने लाेटल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामाचे आदेश देताना आडकाठीचे धोरण अनेकांनी स्विकारले.
आता प्रशासक असल्याने या कर्मचाऱ्यांना कामाचे आदेश संपुष्टात आल्या नंतर लगेच दोन दिवसाचा खंड देवून कामाचे आदेश दिले जातील, अशी शक्यता व्यक्त केल्या गेली होती. पूर्वी विलंबाने का होईना सहा महिन्याचे कामाचे आदेश दिले जात असताना प्रशासकाच्या काळात मात्र या कर्मचाऱ्यांना कंत्राटी म्हणून नियुक्त करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
मानसेवी कर्मचाऱ्यांच्या सहा महिने मुदतवाढीचा प्रस्ताव मंजुर करुनही प्रारंभी एक महिन्याचे तर आता दोन महिन्याचे कामाचे आदेश देण्यात आले आहेत. एक आणि दोन महिन्याचे कामाचे आदेश दिले जात असल्याने मानसेवी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. दोन महिन्या नंतर उर्वरित तीन महिन्याच्या कामाचे आदेश दिले जाणार की, पुढे पुन्हा कामाचे आदेश मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार, अशी धाकधुकही महापालिकेत कार्यरत मानसेवी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.