आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा हद्दवाढ भागातील रखडलेल्या विकास कामे होणार सुरू लवकरच प्रारंभ:28 कोटींमध्ये 218 कामे; राहिलेल्या कामांसाठी अद्यापही 7 कोटींची गरज

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दवाढ भागातील रखडलेल्या विकास कामांसाठी राज्य शासनाने दिलेल्या 28 कोटी रुपयाच्या निधीतील 218 विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महापालिकेची हद्दवाढ ऑगस्ट 2016 मध्ये झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकी पूर्वीच महापालिकेने हद्दवाढ भागाच्या विविध विकास कामांचा 310 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी तत्कालीन राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. तसेच 20 कोटी रुपयाचा निधीही त्वरित मंजुर केला होता. यात महापालिकेला स्वत:चा 20 टक्के हिस्सा वळता करावा लागला. महापालिकेने एकाच वेळी 100 कोटी रुपयाच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. विकास कामेही सुरु झाले. यात बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि विद्युत विभागातील कामांचा समावेश आहे. रस्त्याचे डांबरीकरण, कॉक्रीटीकरण, लहान नाल्या, मोठे नाले, दोन पुल, जलवाहिन्या टाकणे, महापालिकेच्या खुल्या जागांना फेन्सिंग करणे, विद्युत पोल उभारणे आदी कामे केली जाणार होती. दरम्यान राज्य शासनाने 20 कोटी नंतर 12 कोटी रुपयाचा निधी वळता केला तसेच महापालिकेने स्वत:चा 20 कोटी रुपयाचा हिस्सा वळता केला. यानंतर शासनाने 13 कोटीचा निधी दिला. त्यामुळे 65 कोटी रुपयाची विकास कामे पूर्ण झाली. मात्र साडेतीन वर्षापासून राज्य शासनाने राहिलेला 35 कोटी रुपयाचा निधी न दिल्याने ही विकास कामे थांबली. या नंतर जानेवारी महिन्यात शासनाने 28 कोटी रुपयाचा विकास निधी दिला.

नव्याने प्रसिद्ध कराव्या लागल्या निविदा

पावणेचार वर्षापासून काम बंद असल्याने बांधकाम साहित्यात वाढ झाली. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा निविदा प्रसिद्ध कराव्या लागल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 28 कोटी रुपयाच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे.

सात कोटी पेक्षा अधिक निधीची गरज

हद्दवाढ भागासाठी रखडलेल्या 35 पैकी 28 कोटी रुपयाचा निधी दिला. अद्यापही सात कोटी रुपयाचा निधी रखडलेला आहे. तसेच बांधकाम साहित्याच्या दरात 25 टक्के वाढ झाली आहे. राहिलेल्या कामांसाठी सात कोटी पेक्षा अधिक निधीची गरज भासणार आहे.

बातम्या आणखी आहेत...