आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गाडी रुळावर आली असली तरी अद्याप शिक्षकांच्या वेतनाची गाडी रुळावर आलेली नाही. शिक्षकांचे दोन महिन्याचे वेतन रखडले आहे. तर सेवा निवृत्त शिक्षकांचे एक महिन्याचे रखडले आहे.
महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने महापालिकेला कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकांना नियमितपणे वेतन देता आले नाही. मात्र मागील दिड वर्षापासून परिस्थितीत बदल झाला आहे. ‘अॅडजेस्ट’ करुन का होईना कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जात आहे. फेब्रुवारी २०२३ चे वेतन कर्मचाऱ्यांना २८ फेब्रुवारीच देण्यात आले. मात्र महापालिका शिक्षकांचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे वेतन रखडलेले आहे. महापालिकेत २८८ शिक्षक कार्यरत आहे.
शिक्षकांचे ५० टक्के वेतन राज्य शासनाकडून दिले जाते तर ५० टक्के हिस्सा महापालिकेला टाकावा लागतो. राज्य शासनाकडून ५० टक्के वेतन अनुदान प्राप्त झाल्या नंतर महापालिकेकडून ५० टक्के हिस्सा वळता करुन वेतन दिले जाते. अनेकदा राज्य शासनाकडून वेतन अनुदान येण्यास विलंब होतो तर अनेकदा महापालिकेकडून ५० टक्के वेतन वळवण्यास विलंब होतो. तुर्तास राज्य शासनाकडून ५० टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे एका महिन्याचे वेतन देता येणे शक्य आहे. मात्र महापालिकेला ५० टक्के निधी वळवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने हे शक्य झाले नाही. त्यामुळे अद्यापही शिक्षकांच्या वेतनाची गाडी रुळावर आलेली नाही.
शिक्षकांची संयमाची भूमिका
यापूर्वी वेतन रखडल्यानंतर कर्मचारी, शिक्षक आंदोलन करीत होते. मात्र आता दोन महिन्याचे वेतन रखडल्या नंतरही सर्वच शिक्षकांनी संयमाची भूमिका घेत रखडलेल्या वेतनाची मागणी केली नाही अथवा आंदोलनाचा इशारा दिला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.