आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचा निर्णय:मानसेवींना 8 ते 12 हजाराचा फटका; गत सहा महिन्यांपासून दिले जातेय फक्त 1 महिना कामाचे आदेश

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत मागील सहा महिन्यापासून मानसेवी कर्मचाऱ्यांना केवळ एक महिन्याच्या कामाचे आदेश दिले जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मानसेवी कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यात ८ ते १२ हजार रुपयाचा नाहक आर्थिक भुर्दुंड सहन करावा लागला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा मानसेवींना एक महिन्याच्या कामाचे आदेश दिले जाणार आहेत.

कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या निर्णयाचा फायदा झाला. कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना त्यांची सर्व थकीत देणी देण्यात आली. मात्र कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचा आर्थिक फायदा करताना महापालिकेत गेल्या १५ ते २३ वर्षापासून मानसेवी म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका दिला आहे.

महापालिकेत कार्यरत ११३ मानसेवी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी कामाचे आदेश दिले जातात. महापालिकेत पदाधिकारी कार्यरत असे पर्यंत सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देवून कामाचे आदेश देण्यात आले. मात्र पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्या नंतर प्रशासनाकडून मानसेवींना कामाचे आदेश द्यावे की नाही? इथुन सुरुवात झाली. अखेर एक-एक महिन्याचे कामाचे आदेश देण्यात आले. यामुळे मानसेवींना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

असा बसतोय आर्थिक फटका

मानसेवी कर्मचाऱ्यांना कामाचे आदेश देताना त्यांच्याकडून १५० रुपयाचा बॉन्ड पेपर घेतला जातो. तसेच एक दिवसाचा खंड द्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येक मानसेवी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात होते. त्यामुळे प्रत्येक वेळी कामाचे आदेश घेताना १५० रुपये बॉन्ड पेपर आणि एक दिवसाचे वेतन कपात. असा कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार काही कर्मचाऱ्यांना आठ हजार तर काही कर्मचाऱ्यांना १२ हजार रुपयाचा आर्थिक फटका बसला आहे.

पुन्हा एक महिन्याचे आदेश

मानसेवी कर्मचाऱ्यांचे एक महिन्याच्या कामाचे आदेश ३१ मार्च रोजी संपुष्टात आले. त्यामुळे आता पुन्हा एक महिन्याच्या कामाचे आदेश दिले जाणार आहेत. तर कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या कंपनीला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.